‘परिवर्तन पॅनल’ला आदिवासी, अल्पसंख्यांक व बहुजनांचा पाठिंबा

कोणाचे गणित बिघडविणार?

गडचिरोली : विविध आंबेडकरी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीसाठी निर्माण केलेल्या ‘गडचिरोली परिवर्तन पॅनल’च्या समर्थनार्थ शहरातील अनेक आदिवासी, अल्पसंख्यांक व बहुजन संघटना जोमाने प्रचारकार्यात उतरल्या आहेत. त्यामुळे परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वनिता बांबोळे आणि नगरसेवकपदाचे उमेदवार मजबूत स्थितीत आल्याचा दावा पॅनलच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अशा स्थितीत हे पॅनल कोणाचे गणित बिघडविणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे अध्यक्ष विनोद मडावी आणि बिरसा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष, साहित्यिक दशरथ मडावी यांनी परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठींबा देत असल्याचे पत्र दिले आहे. मुस्लीम व माळी समाज समुदायातील विविध नेत्यांनी परिवर्तन पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार वनिता बांबोळे यांची भेट घेऊन फुले-आंबेडकरी विचारधारेच्या अधिष्ठानावर निर्माण झालेल्या परिवर्तन पॅनलसोबत आपण सदैव राहू, असे सांगितले.

परिवर्तन पॅनलच्या वतीने निवडणूक लढणाऱ्या सर्व उमेदवारांनी ‘आम्ही कोणतीही ठेकेदारी करणार नाही’ असे आश्वासन दिल्याने या आघाडीला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून सुरक्षित, स्वच्छ, हरित, आणि समृद्ध गडचिरोलीच्या निर्माणाचे आश्वासन देणारा ‘जाहीरनामा’ही घोषित केला आहे. शहरात परिवर्तन पॅनलद्वारे काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला सर्वसामान्य नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.