गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) हाती गडचिरोली नगर परिषदेची सुत्रे दिल्यास शहरातील घरकुल, जमिनीचे पट्टे आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावल्याशिवाय राहणार नाही. याशिवाय गोकुळनगरच्या तलावाचे सौंदर्यीकरण करून त्या ठिकाणी बोटिंग, म्युझिकल फाउंटेन, गार्डन अशा सोयी करून नागरिकांसाठी विरंगुळ्याचे मोठे ठिकाण म्हणून विकसित करू. त्यासाठी आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांना निवडून देऊन नगर परिषदेत पाठवा, असे आवाहन माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले.
गडचिरोलीमधील प्रभाग 11 मध्ये रविवारी संध्याकाळी घेतलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तनुश्री आत्राम, कविता मोहरकर, रविंद्र ओल्लालवार, श्रीनिवास गोडसेलवार, तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अश्विनी रविंद्र नैताम, नगरसेवकपदाचे उमेदवार लिलाधर भरडकर आणि प्रतिक्षा अविनाश कुमरे हे मंचावर उपस्थित होते.
यावेळी धर्मरावबाबा म्हणाले, मी ज्या-ज्या वेळी आमदार झालो त्या-त्या वेळी मला मंत्रीपदाची संधी मिळाली. या जिल्ह्यात 8 चे 12 तालुके मीच केले. आता गडचिरोली शहर वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे पालकत्व घेतले आहे पण गडचिरोली अजून स्मार्ट सिटी नाही. विसापूरमध्ये स्मशानभूमीत जाण्यासाठी साधा रस्ता नसेल तर वर्षभरात स्थानिक लोकप्रतिनिधींनी काय केले. ते इंजेक्शन देणारे डॅाक्टर आहे, पण मी समाजसेवेत डॅाक्टर झालो आहे. गोरगरीब, सर्वसामान्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी नगर परिषदेच्या शाळा डिजीटल करायच्या आहेत. त्यासाठी आमच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले.
80 टक्के समाजकारण- भरडकर
यावेळी सदस्यपदाचे उमेदवार लिलाधर भरडकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मी 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करतो. जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून मोठा निधी खेचून आणत आपल्या प्रभागात विविध कामे केली. 4 वेळा झालेल्या पोलीस भरतीच्या वेळी जिल्हाभरातून येणाऱ्या उमेदवारांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. 8 हजारांवर युवकांनी आतापर्यंत त्याचा लाभ घेतला. त्यातील जवळपास 500 युवक पोलीस आणि वनविभागात रुजू झाले आहेत. मात्र काही लोकांना केवळ निवडणुका आल्या की सामाजिक काम सूचते. आम्ही त्यातले नाही, असे म्हणत तुमचा प्रतिनिधी म्हणून नगर परिषदेत पाठवा, अजून बरेच काही करून दाखविणार, अशी ग्वाही भरडकर यांनी दिली.
































