गडचिरोली : नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (दि.2) होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगर परिषदांमध्ये एकूण 26 उमेदवारांमध्ये लढत आहे. याशिवाय सदस्यपदासाठी 352 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र गडचिरोलीतील 3 आणि आरमोरी येथील एका सदस्याच्या निवडणुकीला निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. अशा स्थितीत मतदान होणार असलेल्या उर्वरित ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने मतदानात सहभाग नोंदवून मतदानाचे कर्तव्य निभावत लोकशाही बळकट करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
ज्या नगर परिषदांमध्ये ज्या जागेसाठी अपिल दाखल होते, मात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर किंवा त्यानंतर देण्यात आला आहे, अशा नगर परिषदांच्या सदस्यपदाच्या त्या जागेच्या निवडणुका स्थगित ठेवण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. त्यानुसार गडचिरोली नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 1 अ, 4 ब आणि 11 ब, तसेच आरमोरी नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक 10 अ अशा चार ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली आहे. येथील निवडणूक सुधारित कार्यक्रमानुसार घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कळविले.
105 मतदान केंद्रे; 117 मतदान पथके
निवडणुकीसाठी प्रशासकीय स्तरावर तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या निवडणुकीसाठी गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तिन्ही नगर परिषदांमध्ये एकूण 105 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण 117 मतदान पथके सज्ज आहेत. त्यात गडचिरोली नगर परिषदेसाठी सर्वाधिक 46 मतदान केंद्रे आणि 51 मतदान पथके तैनात राहतील. देसाईगंज नगर परिषदेत 32 केंद्रे आणि 36 पथके कार्यान्वित असतील. तर आरमोरी नगर परिषदेत 27 मतदान केंद्रे आणि 30 मतदान पथके तैनात आहेत. तीनही नगर परिषदेच्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे दोन प्रशिक्षण घेण्यात आले.
गडचिरोलीत सर्वाधिक उमेदवार
गडचिरोली नगर परिषदेत अध्यक्षपदाकरिता 8 तर सदस्य पदाकरिता 134 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. देसाईगंज नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी 8 आणि सदस्य पदासाठी 110 उमेदवारांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. आरमोरी नगर परिषदेत अध्यक्षपदासाठी सर्वाधिक 10 उमेदवार, तसेच सदस्य पदासाठी 108 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
































