
गडचिरोली : लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी राजकीय नेतेमंडळी सहकुटूंब सरसावले. माजी राज्यमंत्री तथा माजी खासदार मारोतराव कोवासे, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) तथा माजी खासदार डॅा.अशोक नेते यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनीही सपत्निक डॅा.बाबासाहेब आंबेडकर शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे नाव उशिरा नोंदविल्या गेल्याने त्यांचे नाव मतदार यादीत आले नाही. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले.
गडचिरोलीसह आरमोरी आणि देसाईगंज येथे सकाळी 7.30 वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. थंडीचा कडाका असतानाही ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी आघाडीवर होते. अत्यावश्यक सेवेसाठी ज्यांना ड्युटीवर जायचे होते त्यांनी सकाळी 10 वाजतापूर्वी मतदान आटोपले. सकाळी 10 नंतर मतदानाचा वेग थोडा मंदावला होता. न.प.क्षेत्रात सुटी जाहीर केल्याने अनेक मतदार जेवण करून घराबाहेर पडले. त्यामुळे दुपारी पुन्हा मतदारांच्या रांगा वाढल्या.
विशेष म्हणजे इंदिरानगर, लांझेडा, विसापूर भागात मतदान संपण्याची वेळ (संध्याकाळी 5.30 पर्यंत) जवळ आली तरी अनेक मतदार मतदान करण्याचे शिल्लक होते. सर्वाधिक गर्दी विसापूर येथील वीर बाबुराव शेडमाके शाळा या केंद्रावर होती. सर्व मतदारांना 5.30 वाजता केंद्राच्या आवारात घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. संध्याकाळी 6.45 पर्यंत विसापूर केंद्रावर मतदान सुरू होते. तेथील टक्केवारी सर्वाधिक 85 टक्के आहे. याचप्रमाणे देसाईगंज न.प. क्षेत्रातही काही केंद्रांवर संध्याकाळी 7 नंतर मतदान सुरू होते.
































