



गडचिरोली : गडचिरोली, आरमोरी आणि देसाईगंज नगरपरिषदेत मिळून सरासरी 70.60 टक्के मतदान नोंदविण्यात आले. यात आरमोरी नगरपरिषदेसाठी सर्वाधिक 72.85 टक्के, देसाईगंज (वडसा) 72.48 टक्के तर गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रात 68.26 टक्के मतदान झाले आहे. रात्री उशिरापर्यंत मतदान यंत्र (ईव्हीएम) जमा करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर केली.
विशेष म्हणजे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज (दि.3) ला होणारी मतमोजणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने स्थगित केली आहे. नामांकन वैध ठरविण्यावरून आक्षेप आल्याने निवडणूक थांबलेल्या चार सदस्यपदाच्या निवडणुकीनंतर एकाचवेळी सर्व ठिकाणची मतमोजणी (दि.21) होईल.
तीनही नगर परिषद क्षेत्रात मतदान करणाऱ्यांमध्ये पुरूषांच्या तुलनेत महिलांची संख्या जास्त असल्याचे दिसून येते. आरमोरीत 8271 पुरुष आणि 8484 महिलांनी असे एकूण 16 हजार 755 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. देसाईगंजमध्ये 9449 पुरुष, तर 9652 महिला मतदार मिळून 19 हजार 101 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर गडचिरोलीत 14,593 पुरुष आणि 15,107 महिला मतदारांनी, तसेच 2 तृतीयपंथी अशा 29 हजार 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. विशेष म्हणजे दिव्यांग किंवा म्हातारपणामुळे पायी चालत येऊ न शकणाऱ्यांसाठी व्हिल चेअरची व्यवस्था होती. त्यावरून येत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; गुलाबपुष्पाने मतदारांचे स्वागत
मतदान प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. मतदानाची गती, सुविधा व व्यवस्थापनाची माहिती घेताना त्यांनी मतदानासाठी आलेल्या मतदारांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे असून मतदानाचा हा लोकशाही उत्सव अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद शाळा, कार्मेल हायस्कूल, पी.एम.श्री पंडीत जवाहरलाल नेहरू नगरपरिषद शाळा, तसेच लांजेडा नगरपरिषद शाळा या मतदान केंद्रांना भेट दिली. प्रत्येक केंद्रावर मतदार यादी, मतदानाची टक्केवारी, ईव्हीएम मशीनची स्थिती, रांगेचे व्यवस्थापन आणि मतदारांसाठी उपलब्ध सुविधा याची सविस्तर माहिती घेतली. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना मतदानात प्राधान्य देण्याच्या सूचनादेखील त्यांनी मतदान कर्मचाऱ्यांना दिल्या. यावेळी गडचिरोली नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मतदार यादीतील अनेक नावं गायब
गडचिरोली शहरातील मतदार यादीत अनेक लोकांची नावंच दिसत नसल्यानं काही ठिकाणी मतदारांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी एकाच कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या मतदान केंद्रात विखुरल्या गेली, तर काही मतदारांना शोधूनही नावं दिसत नव्हती. त्यामुळे गोंधळ उडाला. आपले नाव नेमक्या कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे शोधताना मतदारांना या केंद्रावरून त्या केंद्रावर धावाधाव करावी लागली. तरीही नाव दिसत नसल्याने अनेक जण मतदान न करताच परतले. यामुळे मतदार यादीत घोळ असल्याचा संशय परिवर्तन पॅनल उमेदवारांसह काही मतदारांनी व्यक्त केला.
































