अहेरी : शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील केवळ 2 किलोमीटरचे डांबरीकरण गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण राहिल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गल्लोगल्ली खड्डे, धुळीचे साम्राज्य आणि वाढत्या अपघातांमुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या अहेरी येथील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आलापल्ली कार्यालयात धडक देऊन या रस्त्याचे काम त्वरित सुरू करा, अन्यथा येत्या 6 डिसेंबर रोजी मुख्य चौकात ‘चक्काजाम आंदोलन’ करण्याचा इशारा दिला.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांना एक निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी उपविभागीय अभियंता रवीकिरण पारेलवार, अभियंता नागेश आडेपवार हेसुद्धा उपस्थित होते. अहेरी शहराच्या मुख्य रस्त्यावरील डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपूर्वी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भूमिपूजन करून सुरू केले, मात्र त्यानंतर ते काम बांधकाम विभागाकडून वारंवार थांबवण्यात आले.
या अर्धवट कामामुळे नागरिकांची तसेच वाहनधारकांची तारांबळ उडत आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानात वारंवार धुळ येत असल्याने ते त्रस्त झाले आहेत. मुख्य रस्ता खराब असल्याने शहरातील अंतर्गत मार्गांवरही खड्डे पडून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
या चर्चेच्या वेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष मद्दीवार, तालुकाध्यक्ष विकास तोडसाम, उपसरपंच संजय अलोने, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, भाजप शहर अध्यक्ष मुकेश नामेवार, नगरसेविका शालिनी पोहनेकर, विकास उईके, भाजयुमोचे जिल्हा सचिव सुचित कोडेलवार, अल्पसंख्याक आघाडीचे सरफराज आलम, रवी जोरगेलवार, कोमेश सडमेक, निखिल बोंम्मावार, राहुल मठ्ठामी, शैलेश नामेवार यांच्यासह इतर नागरिक उपस्थित होते.
































