प्लॅटिनमच्या ‘स्टेम’ महोत्सवात झळकले विद्यार्थ्यांमधील टॅलेंट

वैज्ञानिक प्रतिभेला मिळाली चालना

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचे कौतुक करताना अतिरिक्त जिल्हाधिकारी गावंडे

गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या अपार सर्जनशीलतेचा आणि संशोधनशील बुद्धिमत्तेचा उत्कट अविष्कार घडवून आणत प्लॅटिनम ज्युबिली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गडचिरोली येथे भव्य ‘स्टेम’ प्रदर्शन व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विविध वैज्ञानिक मॅाडेल्सच्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी आपल्यातील प्रतिभेची झलक दाखवली.

अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक एम.रमेश, शाळेचे संचालक आमिरअली नाथानी, अझिमा हुड्डा तथा प्राचार्य रहीम अमलानी, शैक्षणिक प्रमुख अमीन नुरानी आणि उपप्राचार्य पारस गुंडावार प्रामुख्याने उपस्थित होते.

सादरीकरणावर प्रेक्षकांचा प्रतिसाद

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले एआय चॅटबॉट, ड्रोन तंत्रज्ञान, जार्विस व्हॉईस असिस्टंट, टेस्ला कॉइल लाईव्ह डेमो, ग्रीन एनर्जी फ्युजन, ऑपरेशन सिंदूर, एअर क्रॅश सेफ्टी मॉडेल, ट्रायबल एज्युकेशन (H-1B जर्नी), शिवाजी महाराज व रायगड किल्ला, प्रश्नमंजुषा, मराठी संस्कृतीचा वारसा, त्सुनामी मॉडेल, अ‍ॅक्सेंट अराउंड द वर्ल्ड, शॅडो पपेट थिएटर व शिक्षा प्रणाली मॉडेल यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, इतिहास, पर्यावरण आणि सांस्कृतिक जतन यांचे प्रभावशाली चित्रण उपस्थितांना अनुभवायला मिळाले.

सांस्कृतिक व्यासपीठावर भाज्या व प्राणी गाणी, मोबाईल साँग, कराटे-म्युझिक, AI नुक्कड नाटक, कोरल रेसिटेशन, कविता, फ्रेंच प्रेझेंटेशन, म्युझिकल सिम्फनी, प्लॅनेट साँग, शेतकरी गीत आणि योगा सादरीकरण यांनी कार्यक्रमाचा कलात्मक रंग अधिक खुलवला आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा वर्षाव मिळवला.

अतिथींकडून विद्यार्थ्यांचे कौतुक

विद्यार्थ्यांचे कौतुक करत मुख्य अतिथी नितीन गावंडे म्हणाले, “अशा प्रकारची STEM प्रदर्शनं ही आजच्या काळाची वास्तविक गरज आहे. विद्यार्थ्यांची कल्पकता आणि नवोन्मेषक विचार करण्याची क्षमता ही आपल्या कल्पनेपलीकडची आहे. अध्यापनात नवी तंत्रे, नवे प्रयोग आणि प्रॅक्टिकल शिक्षण पद्धती सातत्याने वापरा, कारण उद्याच्या भारताला असेच धाडसी विचारवंत आणि वैज्ञानिक घडवण्याची गरज आहे.”

एएसपी एम.रमेश यांनी सांगितले , “विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रत्येक मॉडेल हे त्यांच्या परिश्रमांचे तेजस्वी उदाहरण आहे. हीच शाळेची मूल्याधारित शैक्षणिक परंपरा आहे, जी त्यांना जागतिक व्यासपीठावर घेऊन जाईल.” प्राचार्य रहीम अमलानी यांनी, “प्लॅटिनम ज्युबिली स्कूल मुलांच्या केवळ शिक्षणाची नव्हे तर व्यक्तिमत्त्व घडवण्याचीही दिशा ठरवते. आज सादर झालेले प्रयोग आणि मॉडेल्स त्यांच्या असामान्य क्षमतेचे द्योतक आहेत , विद्यार्थ्यांच्या अथक कष्टामुळे, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हा सोहळा यशस्वी ठरला. विज्ञान आणि कलेचा हा संगमच खरी शिक्षणाची परिभाषा आहे,” असे सांगितले.

हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवीन विचारांना पंख देणारा, ज्ञानाला योग्य दिशा दाखवणारा आणि भविष्यातील स्वप्ने उजळवणारा एक प्रेरणादायी टप्पा ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका समिरा लाखानी, समन्वयक नयना दरडमारे व रोजिना बुधवानी तसेच संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पालकांनीही कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या विज्ञान–कला प्रवासाचे कौतुक केले.