गडचिरोली : श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त “हिंद-की-चादर” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी अस्मिता मोरे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला तहसीलदार (आस्थापना) सचिन जयस्वाल, लालसिंग खालसा, गोवर्धन चव्हाण, सुनीलसिंग पटवा, अजयसिंग पटवा, विनोद बनोत, सलानंदसिंग डांगी, कतारसिंग डांगी, गोपाळ साबळे, जितेंद्र सहला, अमरसिंग गेडाम, विवेक नाकाडे आणि राजासिंग डांगी आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये विविध महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये दिनांक 7 डिसेंबरला नागपूरमधील कार्याक्रमामध्ये अन्नदान व सेवा देण्याबद्दल सहकार्य करण्याचे ठरले. तसेच देसाईगंज येथे होणाऱ्या 350 व्या शहिदी समागम दिनानिमित्त गुरु तेग बहादूर साहेब यांच्या रथ आगमनाच्या आयोजनावर चर्चा करण्यात आली. गडचिरोली येथे आज (दि.4) रथाचे आगमन होणार आहे. त्याचे नियोजन व कार्यवाही करण्याच्या दृष्टीने शिक्षणाधिकारी (प्राथ.), पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय यांना आवश्यक निर्देश देण्यात आले.
याव्यतिरिक्त नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी गडचिरोली येथून नागपूरला जाणाऱ्या प्रतिनिधींच्या सुविधांच्या व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, गुरु तेग बहादूर साहेब यांच्या महान कार्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
































