अहेरीच्या मुख्य रस्त्यासाठी भाजपचे चक्काजाम आंदोलन

काम 3 दिवसांत सुरु करणार

अहेरी : खड्डेमय व अपूर्ण बांधकाम असलेल्या अहेरीतील 2 किमीच्या मुख्य रस्त्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुख्य चौकात जवळपास दीड तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्लीचे कार्यकारी अभियंता रोहित रव्वा यांनी 3 दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात येईल आणि 100 टक्के काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.

अहेरी शहराच्या मुख्य चौकातून जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे, नागरिकांचे होणारे हाल, वाढते अपघात आणि धुळीने व्यापारी वर्गाचे होत असलेले नुकसान या गंभीर बाबींचा निषेध नोंदवत कै.राजे विश्वेश्वरराव महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणानून गेला.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी या समस्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाला धारेवर धरले. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करून पूर्ण करा, कामास कोणताही विलंब लावू नका, अशी मागणी लावून धरण्यात आली. कार्यकारी अभियंत्यांनी त्यांची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.