एलसीबीने उघडकीस आणले मोबाईल टॅावर चोरीचे 8 गुन्हे

3 अटकेत, 5 लाखांचा माल जप्त

गडचिरोली : जिल्ह्रातील दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये मोबाईलचे नेटवर्क पोहोचण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मोबाईल टॉवरची उभारणी केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून मोबाईल टॉवरच्या बॅटरी चोरीला जाण्याचे प्रकार घडत होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करुन विविध ठिकाणावरुन मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणा­ऱ्या 3 आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. या कारवाईत रोख रक्कम व चारचाकी वाहनासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्रातील संवेदनशिल भागातील कांदोली, गुरज्या, येमली, राजाराम खांदला, तलवाडा, ताडगाव, वेदमपल्ली गावातील मोबाईल टॉवरच्या बॅट­ऱ्या अलिके चोरीला गेल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सतत 15 दिवस संवेदनशिल भागात पाळत ठेवली असता, एक पिकअप वाहन रात्रीच्या वेळी टॉवर असलेल्या गावात संशयितरीत्या फिरत असल्याचे मिळून आले. यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनिय बातमीदारांमार्फत सदर वाहन ज्याच्या ताब्यात आहे अशा गोविंद खंडेलवार (19 वर्षे), रा. आलापल्ली याचा शोध घेऊन त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यावेळी धक्कादायक माहिती समोर आहे.

गोविंदच्या ताब्यात असलेले वाहन देखील चोरीचे असून सदर वाहनाचा वापर करुन गोविंद खंडेलवार याने उमेश मनोहर इंगोले (38 वर्षे), रा.नेहरुनगर गडचिरोली आणि इतर दोन सहकाऱ्यांनी मिळून मोबाईल टॉवरच्या बॅट­ऱ्यांची चोरी केल्याचे कबुल केले. त्यांनी चोरी केलेल्या बॅट­ऱ्या अहेरी येथील तिरुपती व्यंकया दासरी, (38 वर्षे) रा.अहेरी यांना विक्री केल्याचे सांगितले. व्यंकया दासरी यांने सदर बॅटऱ्या कागजनगर येथील याकुब शेख याला विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

चोरी केलेल्या बॅटऱ्यांची व साहित्यांची आरोपींनी विल्हेवाट लावली असल्याचे निष्पन्न झाले. बॅटरी विक्री करुन आरोपींनी मिळविलेले रोख रक्कम 2 लाख रुपये, चोरी गेलेल्या बॅटऱ्यांचे इतर साहित्य, चारचाकी पिकअप वाहन (अंदाजे 3 लाख रुपये) असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान आरोपींवर अहेरी येथे 2 गुन्हे, उपपोस्टे पेरमिली येथील 2 गुन्हे, पोस्टे येमली बुर्गी येथे 2 गुन्हे, पोस्टे ताडगाव येथे 1 गुन्हा, राजाराम (खां.) येथे 1 गुन्हा असे एकूण मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीचे 8 गुन्हे, तसेच वाहन चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपी सध्या पोमकें येमली बुर्गी येथील गुन्ह्रात अटकेत असून सर्व गुन्ह्रांचा तपास गडचिरोली पोलिसांकडून केला जात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत, पोउपनि. विकास चव्हाण, मपोउपनि. इंगोले, हवालदार सतीश कत्तीवार, अंमलदार राजू पंचफुलीवार, शिवप्रसाद करमे, श्रीकांत बोईना, धनंजय चौधरी, दीपक लोणारे, गणेश वाकडोतपवार, मपोअं/सुजाता ठोंबरे यांनी केलेली आहे.