अकस्मात जाणे वेदनादायी, अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले

गीता हिंगे यांच्या निधनावर शोक

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे नागपूरजवळील पाचगाव जवळ रविवारच्या मध्यरात्री झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले, हे अत्यंत वेदनादायी असून अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले, अशा शोकसंवेदना पक्षाचे नेते, आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केल्या. याशिवाय माजी खासदार अशोक नेते यांनीही शोक व्यक्त केला. सोमवारी संध्याकाळी पार्थिवावर गडचिरोलीच्या कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या 26 नोव्हेंबर रोजी गीता हिंगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला होता. प्रवेश होताच कामाची पार्श्वभूमी व दखल घेऊन पक्षाने राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्षपद त्यांना बहाल केले. मात्र पक्षप्रवेश होऊन पंधरवड्याच्या आतच काळाने त्यांच्यावर झडप घातल्याने हिंगे परिवारासोबतच आमच्या पक्षाचेही मोठे नुकसान झाले असल्याचे आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

विशेष म्हणजे हिंगे त्यांचा परिवार अहेरी येथे अनेक वर्षे वास्तव्यास होता. त्यामुळे आधीपासूनच आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. गीताताई यांच्या आकस्मिक निधनाने हिंगे परिवारावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर परिवाराला बळ देओ अशी प्रार्थना, आ.डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केली.

एक उजळ दीप विझला- डॅा.अशोक नेते

गडचिरोलीच्या राजकीय, सामाजिक आणि सेवा क्षेत्रात आपली न संपणारी ओळख निर्माण करणाऱ्या
सुशिल, हसतमुख आणि संघर्षशील नेत्या गीता सुशील हिंगे यांच्या निधनावर माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री (एसटी मोर्चा) अशोक नेते यांनी शोक व्यक्त केला. सदैव उजळ, निष्कपट आणि लोकाभिमुख स्वभावाच्या, राजकारणाच्या वादळी वातावरणातही जनतेला धीर देणाऱ्या दीपस्तंभ बनून त्या उभ्या राहिल्या. कितीही संकटे समोर आली, तरीही त्या लोकसेवा आणि न्यायाच्या मार्गावर अढळ राहिल्या. महिलांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची ओढ, गरिब–वंचितांसाठीची त्यांची धडपड इतरांसाठी प्रेरणादायी होती. गीताताईंचे निधन ही फक्त एका कुटुंबाची हाणी नाही, तर समाजाच्या विविध क्षेत्राची आहे, असे म्हणत मा.खा.डॅा.नेते यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.