अहेरी नगरातील कामांसाठी 100 कोटींचा आराखडा तयार

प्रमुख रस्ते गुळगुळीत होणार

अहेरी : अहेरी नगरातील अंतर्गत रस्ते व इतर कामांसाठी अहेरी नगर पंचायत व बांधकाम विभागाला विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिल्या होत्या. त्यानुसार संबंधित विभागाने जवळपास 100 कोटी रकमेचा आराखडा तयार करून शासनाकडे सादर केला आहे. त्याबाबत आ.धर्मरावबाबा आत्राम पाठपुरावा करीत आहेत. यामुळे नगरातील अनेक रस्ते गुळगुळीत होणार आहेत.

येथील बहुचर्चित रखडलेल्या मुख्य रस्त्याचे काम आ.धर्मरावबाबा यांच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आले. मंगळवारी (9 डिसेंबर) युवा नेते हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते दक्षिणमुखी हनुमान मंदिराजवळ डांबर कामाची सुरूवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकारी जिल्हाधक्ष रियाज शेख, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, जिल्हा सचिव सुरेंद्र अलोणे, तालुकाध्यक्ष नागेश मडावी, परशुराम दहागावकर, कंत्राटदार बोम्मावार, अभियंता व नागरिक उपस्थित होते.

अहेरी विधानसभा क्षेत्रात मागील 6 वर्षात आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांनी रस्ते व पुलांच्या विकास कामाकरिता कोट्यावधीचा निधी खेचून आणण्यात यश मिळविले. त्याचीच परिणीती म्हणून अतिदुर्गम भागातील अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता झाली आहे, अशी भावना कट्टर समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार यांनी व्यक्त केली.

यापूर्वी अतिमहत्वाचे असलेले अहेरी ते आलापल्ली रस्ता, अहेरी ते देवलमरी रस्ता आणि अहेरी ते महागाव रस्ता हे अतिशय खराब रस्ते होते. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने नागरिकांना त्रास होत होता. हे लक्षात घेऊन आमदार आत्राम यांनी प्राधान्याने वरील रस्ते मंजूर केले व सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली. त्यापैकी केवळ अहेरी ते प्राणहिता हा रस्ता न्यायालयीन अडचणीमुळे प्रलंबित होता, परंतु आ.धर्मरावबाबा यांनी यंत्रणा व कंत्राटदार यांच्याशी स्वतः चर्चा करून त्यावरील तोडगा काढल्याने आता ही समस्याही मार्गी लागलेली असल्याचे मुक्कावार यांनी सांगितले.

अनेक रस्ते व पुलांची कामे होणार

अहेरी विधानसभा क्षेत्रात पाचही तालुक्यातील दुर्गम भागातील अनेक रस्ते व पुलांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. काही कामे प्रगतीपथावर आहेत. एटापल्ली ते गट्टा रस्त्यावरील बांडीया नदीवरील 24 कोटी रकमेच्या मोठ्या पुलाचे भूमिपूजन आमदार आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले आहे. आलापल्ली ते हेड्री रस्ता बांधकाम पूर्ण करण्यात आला आहे. हेड्री ते गट्टा रस्त्याकरिता खनिज निधीतून तरतूद करण्याबाबत धर्मरावबाबांनी मागणी केली असून लवकरच निधी उपलब्ध करण्यात येईल. तसेच गट्टा ते हेमलकसा रस्त्याला मंजुरी मिळाली आहे. तब्बल 93 कोटी रुपये निधी आमदार आत्रामांनी खेचून आणला आहे. यातील बरीच कामे चालू करण्यात आली असल्याची माहिती अरुण मुक्कावार यांनी दिली.