गडचिरोली : जिल्ह्यातील अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याची तक्रार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे झाली आहे. याबाबत कारवाईसाठी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश आल्यानंतरही कारवाई का होत नाही, असा सवाल काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी हिवाळी अधिवेशनादरम्यान विविमंडळ सभागृहात उपस्थित केला. कारवाई न करण्यासाठी कोणाचा राजकीय दबाव आहे? असा शंकात्मक प्रश्नही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. दरम्यान अधिवेशनात हा मुद्दा उठणार याची चाहुल लागल्याने मुख्याधिकारी शहाणे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणांबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यात 359 कर्मचारी, अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली आहेत. त्यात अहेरी नगर पंचायतचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांचाही समावेश असल्याचे ते म्हणाले.
शहाणे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी बळकावल्याप्रकरणी वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री अतुल सावे म्हणाले, याबाबतची यादी संबंधित विभागाला पाठवण्यात आली आहे. येत्या तीन महिन्यात यावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र कारवाई करण्यासाठी तीन महिने का लागतील, हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.
































