बोनालू उत्सवासाठी तीन राज्यांतील हजारो भाविक जमले आरड्यात

105 वर्षांची परंपरा कायम

सिरोंचा : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या तेलंगणा राज्याच्या सीमेवरील गोदावरी नदीच्या काठावरच्या आरडा गावात दोन दिवसीय बोनालू (जत्रा) उत्सवची सांगता झाली. यावेळी सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील जवळपास 35 हजार भाविकांच्या गर्दीने मल्लिकार्जुन स्वामी मंदिराचा परिसर फुलून गेला होता.

आरडा गावात दरवर्षी डिसेंबर महिन्यात जत्रा भरते. या वर्षीसुद्धा जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. मल्लिकार्जुन स्वामी यांचे भक्तगण सिरोंचा तालुक्यासह तेलंगाणा व छत्तीसगड राज्यांतही आहेत. त्या भाविकांनी या उत्सवादरम्यान आवर्जून हजेरी लावली.

भक्तगणांनी मल्लिकार्जुन स्वामींचे दर्शन घेऊन पूजाअर्चा केली, तसेच आपली मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना साकडे घातले. ही जत्रा तालुक्यातील सर्वांत मोठी जत्रा आहे. भाविक व नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र असते. भाविकांच्या मनोरंजनासाठी तेलंगणा येथील कलाकारांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन बोनालूच्या आधल्या दिवशी केले होते. जत्रेदरम्यान अनुचित घटना घडू नये यासाठी सिरोंचा पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता.

खिरीने भरलेले कलश घेऊन मंदिराभोवती प्रदक्षिणा

बोनालू म्हणजे एका कलशात प्रसादरूपी खिर शिजविली जाते. ती शिजलेली खिर झेंडूच्या फुलांनी सजविलेल्या मडक्यात ठेवली जाते. नंतर ते मडके डोक्यावर घेऊन महिला भाविक मंदिराच्या सभोवताल तीन प्रदक्षिणा घालतात. त्यानंतर स्वामींना प्रसाद अर्पण करून उपस्थित भाविकांनाही प्रसाद वाटला जातो.