मुलचेराच्या तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे अखेर निलंबन

शरीरसुखाची मागणी करणे भोवले

गडचिरोली : आपल्या अधिनस्थ एका उपकेंद्रात कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविकेकडे शरीरसुखाची मागणी केल्याने आणि त्या आरोग्य सेविकेने तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ.विनोद म्हशाखेत्री यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली. ते मुलचेराचे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून जबाबदारी पाहात होते.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी त्यांचे निलंबित करण्याचा आदेश जारी केला. याशिवाय त्यांची विभागीय चौकशीही केली जाणार आहे.

याप्रकरणी डॅा.म्हशाखेत्री यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान जिल्हा परिषदेच्या चौकशी समितीने केलेल्या पडताळणीत डॅा.म्हशाखेत्री यांनी मोबाईलवर त्या आरोग्य सेविकेला पाठविलेले मॅसेजेस आणि सेविकेचे बयान याआधारे समितीने डॅा.म्हशाखेत्री यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची शिफारस केली होती. त्यामुळे आरोग्य विभागाने वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 मधील तरतुदीनुसार त्यांना निलंबित करण्याचे आदेश बुधवारी काढले. निलंबनकाळात डॉ.विनोद म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे.