दर्शनी (माल) येथे दिवसरात्र चालणाऱ्या कबड्डीचा जल्लोष

मा.खा.डॉ.नेतेंच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोली : मौजा–दर्शनी (माल) येथे जय भवानी जय शिवाजी युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित दिवस-रात्र कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या स्पर्धेमुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विस्तीर्ण पटांगणावर सदर स्पर्धा होत आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना मा.खा.डॉ.नेते म्हणाले की, “कबड्डी हा ग्रामीण संस्कृतीचा आत्मा आहे. शरीरसुदृढता, शिस्त, तंदुरुस्ती आणि संघभावना जोपासणारा हा खेळ आहे. पंचांचा निर्णय अंतिम मानून उत्तुंग खेळभावनेने आणि एकजुटीने खेळावे,” असे आवाहन त्यांनी केले. लोकसभेत दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी दर्शनी गावातील नागरिकांचे आभार मानत, आपल्या 10 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा उल्लेख केला. गावातील अडचणी समजून घेऊन त्या निश्चितपणे सोडविल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी डॉ.नेते यांनी खेळाडूंशी हस्तांदोलन करत त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी प्रकाश गेडाम, दत्तु सुत्रपवार आणि विलास भांडेकर यांनीही युवकांना क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित करत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, जेष्ठ नेते डॉ.भारत खटी, तालुका अध्यक्ष दत्तुजी सुत्रपवार, विलास भांडेकर, सरपंच यशोदा बोबाटे, तालुका महामंत्री रमेश नैताम, मोरेश्वर भांडेकर, तंटामुक्ती अध्यक्ष चरणदास पिपरे, पांडुरंग उडाण, सुधाकर वैरागडे, धोंडूजी उडाण, उमाजी पिपरे, उमाजी बोबाटे, विश्वनाथ वासेकर उपस्थित होते.

तसेच जय भवानी जय शिवाजी युवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आर्यन वैरागडे, हिमांशु उडाण, चंदन उडाण, करण भोयर, ऋषिकेश शेरकी यांच्यासह दर्शनी गावातील नागरिक, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या डे–नाईट कबड्डी स्पर्धेमुळे दर्शनी (माल) गावातील क्रीडा संस्कृतीला नवे चैतन्य मिळाले. ग्रामीण खेळांना चालना देणारा आणि तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारा हा उपक्रम ठरला आहे.