जिल्ह्यात 22,646 विधवा, 1149 घटस्फोटीत, तर 407 परित्यक्ता

स्वयंपूर्णतेसाठी उपक्रम राबविणार

गडचिरोली : जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील एकल महिलांचे सविस्तर सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात एकूण 25 हजार 732 एकल महिला आढळून आल्या आहेत. या महिलांसाठी पुनर्वसन, रोजगार निर्मिती आणि स्वयंपूर्णतेचे प्रभावी कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सर्वेक्षणानुसार, एकल महिलांपैकी 22 हजार 646 महिला विधवा, 1 हजार 149 घटस्फोटीत, 407 परित्यक्ता तर 1 हजार 74 महिला प्रौढ अविवाहित आहेत. सामाजिक प्रवर्गानुसार पाहता, एकल महिलांमध्ये 7 हजार 716 अनुसूचित जमातीच्या, 2 हजार 863 अनुसूचित जातीच्या महिला असून उर्वरित महिला इतर प्रवर्गातील आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या पुढाकारातून हे सर्वेक्षण राबवण्यात आले. यानंतर उमेद अभियानाच्या माध्यमातून या महिलांचे अधिक सूक्ष्म सर्वेक्षण करून त्यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीबाबत तसेच व्यवसायाच्या शक्यतांबाबत सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या आधारे एकल महिलांसाठी लक्ष केंद्रीत रोजगार व उद्यमशिलतेचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत.

बचत गटांच्या माध्यमातून रोजगार

उमेद अभियानाच्या अभ्यासानुसार, व्यवसाय करू शकणाऱ्या एकल महिलांच्या वयोगटात 20 ते 40 वयोगटातील 3 हजार 771, तसेच 41 ते 50 वयोगटातील 4 हजार 911, तर 51 ते 60 वयोगटातील 5 हजार 629 महिला आहेत. उर्वरित महिला 60 वर्षांवरील वयोगटातील आहेत. 60 वर्षांखालील एकूण 14 हजार 311 महिलांच्या रोजगारासाठी बचत गटांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

स्वयंपूर्णतेसाठी कर्ज पुरवठा

आर्थिक सक्षमतेसाठी आतापर्यंत खेळत्या भांडवलातून 11 हजार 584 महिलांना कर्ज, तर समुदाय गुंतवणूक निधीतून 6 हजार 318 महिलांना कर्ज देण्यात आले आहे. याशिवाय बँकांच्या माध्यमातून 721 महिलांना, तर वंचितता प्रवण निधीतून 1 हजार 72 महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून महिलांना स्वयंपूर्ण होण्यासाठी हातभार लावण्यात येत आहे. सध्या 569 एकल महिला उत्पादक गटांमध्ये सहभागी असून त्या सामुदायिक पद्धतीने व्यवसाय करत आहेत.

रोजगार प्रेरणा कार्यशाळा

एकल महिलांच्या व्यवसायांना गती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एकल महिलांसाठी रोजगार प्रेरणा कार्यशाळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहेत. महिलांना व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे करण्याला प्रशासन प्राधान्य देत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी स्पष्ट केले. सर्व्हेक्षणानुसार 2 हजार 748 महिलांना कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्या आर्थिक स्थितीनुसार त्या पात्र असलेल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात एकल महिलांच्या रोजगार निर्मितीतून स्वयंपूर्णता साधणारे अभिनव मॉडेल उभे करण्याची भावना प्रशासनाने व्यक्त केली आहे. या उपक्रमातून एकल महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.