गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून 5 किमी अंतरावर असलेल्या खरपुंडी येथील हिराजी पंढरी निकोडे यांच्या पक्क्या घराला एका बाजूने रात्री 11 ते 12 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात घराच्या आवारात ठेवलेली दुचाकी (क्रमांक MH 33, Z 2649) जळून खाक झाली.
ही दुचाकी खरपुंडी येथील हिराजी निकोडे यांच्या मालकीची होती. गाडीमालक निकोडे हे याच दुचाकीने आपल्या शेतातील भाजीपाला विकण्यासाठी गडचिरोली येथील गुजरीमध्ये जाणे-येणे करत होते. ऐन भाजीपाल्याच्या हंगामात ही घटना घडल्याने हिराजी निकोडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या दुचाकी वाहनासोबत एक फवारणी पंप, दोन मोटार पाईप, पाच हजार रुपये आणि सोबत इतर चिल्लर साहित्य असे एकूण दीड लाखापर्यंतचे नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
































