गडचिरोली : येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हृदयरोगाच्या संशयित बालकांसाठी ‘बाल 2-डी ईको’ मशिनचे उद्घाटन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आले. यानिमित्त 2-डी ईको तपासणी शिबीर मंगळवारी यशस्वीरीत्या पार पडले.
जिल्ह्यातील 0 ते 18 वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोगग्रस्त बालकांच्या पालकांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या या अत्याधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. जन्मत: हृदयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार व शस्त्रक्रियेद्वारे बालकांचे आरोग्यपूर्ण भविष्य घडविणे शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आरबीएसके – डीईआयसी कार्यक्रमाच्या माध्यमातून 0 ते 18 वर्षे वयोगटातील बालके व विद्यार्थ्यांची सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येते. या तपासणीदरम्यान जन्मत: आजार किंवा हृदयरोगाची शंका असलेल्या बालकांची पुढील तपासणी, निदान निश्चिती, तज्ज्ञ सल्ला, विशेष चाचण्या व आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया यासाठी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील ‘जिल्हा शिघ्र हस्तक्षेप केंद्र’ (डीईआयसी) द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष म्हणून कार्यरत आहे. गरज भासल्यास तृतीयस्तरीय आरोग्य सेवेसाठीही येथून व्यवस्थापन करण्यात येते.
मंगळवारच्या 2-डी ईको तपासणी शिबिरामध्ये नागपूर येथील प्रसिद्ध बाल हृदयरोगतज्ज्ञ डॉ.प्रमोद अंबदकर व त्यांचे पथक उपस्थित होते. या शिबिरात एकूण 200 बालके व विद्यार्थ्यांची 2 डी- ईको तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे 41 बालकांना शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निष्पन्न झाले. काही बालकांचा पुढील पाठपुरावा करणे गरजेचे आहे. निदान निश्चित झालेल्या बालकांच्या पालकांना तज्ज्ञांकडून सविस्तर समुपदेशन करण्यात आले. राज्यस्तरीय मार्गदर्शक सूचनांनुसार पात्र बालकांना तृतीयस्तरीय संदर्भसेवेसाठी डीईआयसीमार्फत आवश्यक व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी पंडा यांनी जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील नवनिर्मित इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली, तसेच रुग्णालयात कार्यरत सर्व विभागांना भेट देऊन उपलब्ध आरोग्य सेवा व सुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली. दुर्गम व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात तज्ज्ञ आरोग्य सेवा जिल्हास्तरावरच उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिबिरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सतीशकुमार साळुंखे यांनी विशेष मार्गदर्शन केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रशांत पेंदाम, डीईआयसी व्यवस्थापक प्रशांत खोब्रागडे यांच्या नियोजनात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र, बाल आरोग्य विभाग, जिल्हा महिला व बाल रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
































