गडचिरोली : एटापल्ली तालुक्याच्या अतिदुर्गम क्षेत्रातील दोलंदा गावात अनेक वर्ष भुमिया (गाव पुजारी) म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या वडीलांच्या स्मृती पुढील पिढीच्या स्मरणात राहाव्यात यासाठी पाच बहिणींनी मिळून गावाच्या वेशीवर चक्क त्यांचा पुतळा उभारला. चमरा तुला कोरचा असे त्या गाव पुजाऱ्याचे नाव आहे. संपत्तीपेक्षा संस्कार आणि स्मृती अधिक मौल्यवान आहेत, हे त्या पाच बहिणींनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
स्व.चमरा तुला कोरचा हे तब्बल 21 गावांचे भुम्या (पुजारी) म्हणून कार्यरत होते. आदिवासी समाजातील धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा जपण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते. समाजातील सलोखा टिकवणे, रूढी-परंपरा जपणे तसेच आदिवासी मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे, असे कार्य त्यांनी आयुष्यभर केले.
स्व.चमरा तुलाराम कोरचा हे मूळचे छत्तीसगड राज्यातील संगम येथील रहिवासी होते. इंग्रज राजवटीच्या काळात ते दोलंदा गावात राहायला आले आणि तेव्हापासून याच गावाशी एकरूप झाले. सुमित्रा, चंदा, तुलसी, तेजस्विनी आणि पार्वती अशा त्यांच्या पाच कन्या आहेत. मुलगा नसतानाही कन्याच त्यांच्या कुटुंबाचा खंबीर आधार बनल्या.
14 डिसेंबर रोजी चमरा कोरचा यांचे निधन झाले. त्यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार असून, तिथे सुंदर बगीचाही उभारण्यात येणार आहे. तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्याचा मानस स्व.चमरा कोरचा यांची कन्या चंदा कोरचा यांनी व्यक्त केला. चंदा कोरचा या स्वतःही सामाजिक कार्यात सक्रिय योगदान देत आहेत.
आदिवासी समाजात मृत्यूनंतर समाधी बांधण्याची परंपरा आहे. मात्र सामान्य आदिवासी कुटुंबातील पाच बहिणींनी वडिलांचे कार्य समाजासमोर सदैव तेवत राहावे, या हेतूने पुतळा उभारून एक वेगळा सामाजिक आदर्श निर्माण केला आहे.
पुतळा अनावरणप्रसंगी माजी इलाखा प्रमुख महादू दुगा, गडवा कुमोटी (छत्तीसगड), परमेश्वर गावडे (सरपंच, दुर्गापूर), गोसू कोरचा, नेवसू कोरेट्टी, सुकराम कोरेट्टी, बुधराम कोरेट्टी, मसूरू पाटील पोटावी, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वासुदेव कोडापे, सामाजिक कार्यकर्ते योगेश कुमरे, रैन हिचामी, शिशू नरोटे, मनोज झुरी, रमेश आतला, कमल नाई सिडाम, सुकोबाई पोटावी, सोमाजी आतला यांच्यासह विविध गावांतील ग्रामसभा सदस्य, इलाखा सदस्य, गावकरी, नातेवाईक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
































