गडचिरोली आणि आरमोरीत आज रात्री थांबणार प्रचार

4 जागांसाठी 19 उमेदवार रिंगणात

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अर्ज वैध ठरविण्यावरून आलेल्या आक्षेपांमुळे गडचिरोली आणि आरमोरी नगर परिषदेच्या मिळून ज्या 4 जागांची निवडणूक प्रक्रिया थांबवली होती त्यांचे मतदान येत्या 20 डिसेंबरला होणार आहे. या चार जागांसाठी एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. आज रात्री 10 वाजता जाहीर प्रचार थांबणार आहे.

गडचिरोलीत प्रभाग क्र.1 अ, प्रभाग 4 ब आणि प्रभाग 11 ब, तर आरमोरीत प्रभाग 10 अ मधील नगरसेवकपदासाठी दि.20 ला मतदान होत आहे. याशिवाय त्या प्रभागातील मतदार नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठीही मतदान करतील. 21 डिसेंबरला जिल्ह्यातील तीनही नगर परिषदांच्या अध्यक्षपदासह सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या मतांची मोजणी होऊन निवडणूक निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा या निकालाची उत्सुकता वाढली असून विविध अंदाज बांधणे सुरू झाले आहे.

गडचिरोलीत प्रभाग 1 अ मधून काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश चौधरी, प्रभाग 11 ब मधून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके अशा प्रमुख उमेदवारांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे संबंधित प्रभागांमध्ये चुरस दिसत आहे. नागरिकांशी जुळलेली नाळ, जनसंपर्क, सामाजिक उपक्रम अशा विविध पातळ्यांवर कोणता उमेदवार बाजी मारतो, यावर विजयाचे गणित अवलंबून राहण्याची शक्यता आहे.