
गडचिरोली : एशियन युथ पॅरा गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची कन्या श्वेता कोवे हिचे आष्टीत अतिशय उत्साहात स्वागत करण्यात आले. आष्टीत आगमन झाल्यानंतर व्हिन्टेज कारमधून तिची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गडचिरोलीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी तिचा सत्कार केला. एवढेच नाही तर मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफार्मवर श्वेताचे कौतुक करत तिचे अभिनंदन केले.
आष्टीच्या महात्मा ज्योतिबा फुले कला महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थिनी असलेल्या श्वेता हिने आष्टीच्या तिरंदाजी प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण घेतले. दिव्यांग असताना श्वेताने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक कमविणे जिल्हावासियांसाठी अभिमानाची बाब असल्याने वनवैभव शिक्षण मंडळाचे सचिव अब्दुल जमीर हकीम, शाहीन हकीम, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, पोलीस निरीक्षक विशाल काळे, गावातील सरपंच आणि इतर पदाधिकाऱ्यांनी श्वेताचे भव्य स्वागत करत तिचा सत्कार केला.
जिल्हा प्रशासनाकडून गौरव
श्वेता मंजु भास्कर कोवे हिने धनुर्विद्या (कंपाऊंड राऊंड) प्रकारात वैयक्तिक सुवर्णपदक आणि सांघिक कांस्यपदक पटकावून मिळवलेल्या घवघवीत यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांच्या हस्ते जिल्हा प्रशासन व क्रीडा विभागाच्या वतीने श्वेता हिचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “श्वेता कोवे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेली कामगिरी अत्यंत गौरवास्पद असून तिचे यश हे गडचिरोली जिल्ह्यातील खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे,”
श्वेता कोवे ही खेलो इंडिया आर्चरी प्रशिक्षण केंद्र, आष्टी (ता.चामोर्शी) येथे धनुर्विद्येचे प्रशिक्षण घेत आहे. ती प्रा.डॉ.श्याम कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग आठवीपासून धनुर्विद्या या खेळाचा नियमित सराव करीत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक
आष्टी येथील विद्यार्थिनी तथा दिव्यांग खेळाडू श्वेता कोवे हिने पॅरा आर्चरी स्पर्धेत सुवर्ण व कास्यपदकांची कमाई करत देशाचे आणि जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’ (ट्विटर) या समाज माध्यमावरून तिचे अभिनंदन केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या संदेशात श्वेताच्या जिद्दीला, परिश्रमांना आणि आत्मविश्वासाला सलाम करत तिचे यश अभिमानास्पद असल्याचे नमूद केले आहे. दुर्गम भागातून आलेल्या एका तरुणीने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर चमकदार कामगिरी करत पदके पटकावणे हे अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
श्वेताच्या वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या कष्टाने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत तिला सातत्याने प्रोत्साहन दिले. आईच्या पाठबळावर आणि स्वतःच्या अथक मेहनतीवर विश्वास ठेवत श्वेताने जीवनातील अनेक अडचणींवर मात केली. एशियन युथ पॅरा गेम्समध्ये तब्बल 14 देशांच्या खेळाडूंशी स्पर्धा करत तिने सुवर्ण व कांस्य पदक पटकावले.
भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या श्वेता कोवेच्या या यशामुळे दुर्गम व आदिवासी भागातील असंख्य मुला-मुलींना नवी दिशा, आशा आणि आत्मविश्वास मिळाला आहे. तिची ही कामगिरी युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले आहे.
































