
देसाईगंज : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना’अंतर्गत दि.18 डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी कोंढाळा ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी भुयार यांनी गावातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.
गावांचा सर्वांगीण विकास साधून पंचायत राज संस्थांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत कोंढाळा ग्रामपंचायतीने केलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गावात आल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
भुयार यांनी गावामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, तसेच संत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे पुजन केल्यानंतर सरपंच अपर्णा राऊत यांचा मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या वाचनालयाची पाहणी त्यांनी केली. ग्रामसेवक विधाते यांनी ग्रामपंचायतीने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि अभियानाच्या निकषानुसार आवश्यक अभिलेखे (रेकॉर्ड) पाहणीसाठी सादर केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचे ई-गव्हर्नन्स, कर वसुली, गावातील स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, जिल्हा परिषद शाळेतील उपक्रम आणि पळसबाग, तसेच गावातील मशरूम उत्पादन कंपनी, फळबाग, राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनांची प्रत्यक्ष पाहणी केली.
गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहा
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, “गावाचा विकास हाच राज्याचा विकास आहे. समृद्ध पंचायत राज अभियानामुळे गावांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन पायाभूत सुविधांचे जाळे बळकट होईल.” त्यांनी सरपंच अपर्णा राऊत आणि ग्रामसेवक धकाते यांना गावातील अपूर्ण कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या आणि शासकीय योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
































