गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या रणसंग्रामात यावेळी प्रभाग 11 ब मधील लढत चर्चेचा विषय झाली होती. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल तिडके यांच्यात या प्रभागात चुरशीची लढत झाली. शनिवारी दुसऱ्या टप्प्यात या प्रभागात मतदान झाले. मात्र 15 दिवस आपणच कसे सरस आणि योग्य उमेदवार आहे, हे प्रचारादरम्यान मतदारांना सांगणाऱ्या या दोन्ही उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी डॅा.आंबेडकर न.प.शाळा या केंद्राबाहेर एकत्रित आल्यानंतर हातात हात घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून एकमेकांविरूद्ध लढलो असलो तरी निवडणूक संपल्यानंतर आमच्यात कोणतीही कटुता नाही, हा संदेश त्यांनी या प्रसंगातून दिला.
लीलाधर भरडकर यांनी आपल्या मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या प्रभागातील रोशन कवाडकर, संदीप पेदापल्लीवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लिलाधर भरडकर, भाजप उमेदवार अनिल तिडके, अपक्ष उमेदवार विवेक बैस आदी सर्वांनी मिळून केंद्राबाहेर सामुहिक फोटो काढून खेळीमेळीचे वातावरण असल्याचे सिद्ध केले.
मतदानानंतर बोलताना भरडकर म्हणाले, लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. मतदान हा केवळ हक्क नसून जबाबदारी देखील आहे. त्यामुळे लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येकाने सहभागी व्हावे.
































