गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या दि.20 डिसेंबरला मतदान झालेल्या प्रभाग क्रमांक 4 ब मधील निकालाने भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. या ठिकाणी जेमतेम एका मताने काँग्रेसचे श्रीकांत देशमुख हे भाजपचे संजय मांडवगडे यांच्यावर मात करून विजयी झाले. पण या निकालानंतर भाजपच्या वतीने पुनर्मोजणीची मागणी केल्यानंतर हा निकाल रोखून धरला होता.
या प्रभागातील उमेदवारांचे मतदान दि.20 ला झाले असताना दि.2 च्या मतदानासाठी आलेले पोस्टल बॅलेटमधील मते ग्राह्य धरू नये, असाही मुद्दा भाजपने मांडला. एका मताने विजयी झालेले देशमुख यांना विजयाचे प्रमाणपत्र देण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नकार देत थांबण्यास सांगितले.
दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच स्थगित करण्याची मागणी केली. पण निवडणूक आयोगाचे मार्गदर्शन घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी स्मिता बेलपत्रे यांनी संध्याकाळी विजयाचे प्रमाणपत्र श्रीकांत देशमुख यांना सोपवले. दरम्यान यावर आपला आक्षेप कायम असून याप्रकरणी न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा यांनी सांगितले.
विजयी श्रीकांत देशमुख यांना 717, तर संजय मांडवगडे यांना 716 मते मिळाली आहेत. पोस्टल बॅलेटमध्ये देशमुख यांना एक मत जास्त मिळाले आहे.
































