गडचिरोली : भारतीय कपास निगम अंतर्गत शासनाच्या आधारभूत किमतीनुसार कापूस विक्री करण्यासाठी कपास किसान अॅपवर नोंदणीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे. गडचिरोली जिल्ह्यात अंदाजे 6 हजार कापूस उत्पादक शेतकरी आहेत. ज्यांनी अद्याप नोंदणी केली नाही त्यांनी लवकर किसान अॅपवरून नोंदणी करावी, असे आवाहन महा.राज्य मार्केटिंग फेडरेशन लि.मुंबईचे संचालक तथा जि.प.चे माजी कृषी सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले. (अधिक बातमी खाली वाचा)

जिल्ह्यात लाखो विंवटल कापुस उत्पादित झालेला आहे. मात्र आतापर्यंत केवळ 1702 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, तर 1218 शेतकन्यांनी संपुर्ण कागदपत्रांसह कपास किसान अॅप डाऊनलोड केले आहे. त्यांचे अलॉटमेंट झाले आहे. 516 शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे कपास किसान अॅपवर अपलोड न केल्यामुळे त्यांचे अलॉटमेंट झालेले नाही.
– तर शेतकऱ्यांचे होणार नुकसान
आतापर्यंत 572 शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत कापूस केंद्रावर कापूस विक्री केला आहे. अद्याप अंदाजे 4 हजार शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत कापूस विक्री केंद्रावर कापुस विक्रीची नोंद केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे वैयक्तिक लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. गडचिरोली जिल्हयात बाहेरील कापूस खरेदीदार व्यापारी अंदाजे 6500 ते 7000 च्या भावाने कापूस खरेदी करतात, तर शासनाच्या आधारभूत खरेदी केंद्रावर कापुस विक्रीचे दर मध्यम धागा 7710 रुपये आणि लांब धागा 8110 रुपये प्रतिक्विंटल असा भाव आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या कापुस खरेदी केंदावर वाहतुक करण्याकरीता अंदाजे एका ट्रकसाठी 8 ते 10 हजार रुपये खर्च येत असला तरी एका ट्रकगाडीत अंदाजे 70 ते 80 क्विंटल कापूस येतो. म्हणजेच अंदाजे 80 हजार रुपयांचा नफा मिळतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी पूर्ण केली नाही त्यांनी कापूस विक्रीकरीता संपुर्ण कागदपत्रांसह शासनाच्या कापुस किसान अॅपवर सर्व कागदपत्रे अपलोड करून कापूस विक्रीची नोंदणी करावी, असे आवाहन गण्यारपवार यांनी केले आहे.
नोंदणीसाठी अडचण असल्यास संपर्क करा
कपास किसान अॅपवर शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरुन नोंदणी करायची आहे. ज्या शेतकऱ्यांना नोंदणी करण्यास अडचण निर्माण होत असले त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथील कर्मचाऱ्यांशी संपर्क करून आपली नोंदणी करून घ्यावी. गडचिरोली जिल्हयात शासनाचे सीसीआय कापुस हमीभाव खरेदी केंद्र चामोर्शी तालुक्यातील मे.आस्था जिनिंग अॅन्ड प्रेसिंग, अनखोडा तसेच मे. प्रिन्स कॉटन जिनिंग अनखोडा येथे आहे. शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कापूस न विकता या केंद्रांवर कापूस विकून आपले नुकसान टाळावे, असे आवाहन अतुल गण्यारपवार यांनी केले आहे.
































