गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश संपादन करून नगराध्यक्षपदी अॅड.प्रणोती सागर निंबोरकर यांचा दणदणीत विजय झाला. त्यांच्या या विजयाबद्दल माजी खासदार तथा भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी पुष्पगुच्छ देऊन निंबोरकर यांचे अभिनंदन केले. शहराच्या विकासासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांकडून लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतीमान कामकाज होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. (अधिक बातमी खाली वाचा)

यावेळी मा.खा.डॉ.नेते यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांसह सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अॅड.प्रणोती निंबोरकर म्हणाल्या,
“या यशामागे मा.खा.डॉ.अशोक नेते यांचे सक्षम नेतृत्व, मार्गदर्शन आणि भक्कम संघटनात्मक कार्य मोलाचे ठरले आहे. पक्षातील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच गडचिरोलीतील जनतेच्या विश्वासामुळेच हे यश शक्य झाले.”
यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मनापासून आभार मानले. या विजयामुळे गडचिरोली नगरपरिषदेत भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक भक्कम झाली असून, आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.
याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, सागर निंबोरकर, मनिष समर्थ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
































