गडचिरोली : वारंवार मागणी करूनही एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा दिला जात नसल्याने पोर्ला या गावातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी मुख्य मार्गावर ठाण मांडून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे गडचिरोली ते नागपूर या मुख्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ झाली. अखेर त्यांनी सर्व गाड्यांना थांबा देण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. (अधिक बातमी खाली वाचा)

गडचिरोली ते आरमोरी मार्गात पोर्ला या मुख्य गावाला बसचा थांबा आहे. मात्र अनेक बसेस थांबतच नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. वास्तविक पोर्ला येथील अनेक विद्यार्थी आरमोरी, गडचिरोली येथे शिक्षणासाठी येतात. पण थांबा नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या मनस्तापाला कंटाळून विद्यार्थ्यांनी अचानक रस्त्यावर ठाण मांडून चक्काजाम आंदोलन केले.
पोलीस आणि महसूल यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून विद्यार्थ्यांची समजूत काढली. बस थांबा देण्याचे आश्वासनही दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेतले. यावर कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थी व पालकांनी दिला आहे.
































