जि.प.च्या मैदानावर जिल्हास्तरिय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ

'सरस' महोत्सवालाही सुरूवात

शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे स्वागत करताना सीईओ सुहास गाडे, मंचावर इतर अधिकारीगण

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा, अधिकारी-कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2025-26 चा उद्घाटन सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक मिळवून देणारी खेळाडू श्वेता मंजुषा भास्कर कोवे हिच्या नावाने जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या ‘श्वेता कोवे क्रीडानगरी’ येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते. याशिवाय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, प्रकल्प संचालक राहुल काळभोर, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्ली, धनंजय दुम्पेट्टीवार आणि अमित मानुसमारे यांनी केले. तर आभार विस्तार अधिकारी (शिक्षण) जितेंद्र सहाळा यांनी मानले. या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे आणि वैभव बारेकर यांच्यासह संपूर्ण चमू परिश्रम घेत आहे.

‘सरस’ महोत्सवाला सुरूवात

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, तसेच उमेद –महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहायता बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय ‘सरस’ विक्री व प्रदर्शनाचे आयोजन दि.23 ते 26 डिसेंबर या कालावधीत जिल्हा परिषद परिसरात करण्यात आले आहे.

या विक्री व प्रदर्शनामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अनेक महिला स्वयंसहायता गटांचे स्टॉल सहभागी झाले आहेत. महिलांनी स्वहस्ते तयार केलेल्या विविध प्रकारच्या उत्पादनांची विक्री येथे केली जाणार आहे. यामध्ये मध, जांभूळ व सिताफळ प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, मोहापासून बनवलेले विविध खाद्यपदार्थ, लाकडी शोभेच्या वस्तू, कुक्कुटपालन व मत्स्यपालनाशी संबंधित उत्पादने यांचा समावेश आहे. तसेच पीएमएफएमई योजनेअंतर्गत प्रक्रिया उद्योगांना चालना देणारी उत्पादनेही येथे उपलब्ध असतील.

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांना त्यांच्या उत्पादनांचे शहरी बाजारपेठेतील विक्री अनुभव मिळणार आहे. लघुउद्योगांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न उमेद अभियानांतर्गत सुरू आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी संस्कृतीचे दर्शन शहरी नागरिकांना घडणार आहे.

प्रदर्शनात महिला स्वयंसहायता गटांनी तयार केलेली लोणची, चटण्या, लाकडी हस्तकला वस्तू, वनउपजापासून निर्मित खाद्यपदार्थ, ग्रामीण कलाकुसरीची उत्पादने, घरगुती मसाले, पापड, कुरडई तसेच इतर स्वादिष्ट पदार्थांचे स्टॉल असतील. यासोबतच सावजी मटन, बंगाली फिश, बंगाली स्वीट्स, तसेच भामरागड, एटापल्ली, कोरची या दुर्गम आदिवासी भागांतील पारंपरिक खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत.