कुरखेडा : सरकारने घालून दिलेली ध्वजसंहिता न पाळता तिरंगी राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्याचा गंभीर प्रकार घडला असताना कुरखेडा नगर पंचायत मात्र याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यास तयार नाही. आम्ही सर्व कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणने लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. त्यातून ही गंभीर चूक कोणी केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे उत्तर प्रभारी मुख्याधिकारी असलेले नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांनी सांगितले. वास्तविक कोण दोषी हे शोधण्याचे काम पोलिसांचे आहे, मात्र हे प्रकरण पोलिसात देण्यास टाळाटाळ करून नगर पंचायत प्रशासन संबंधित कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे यातून स्पष्ट दिसत आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

या प्रकरणी अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचल्याने नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. नगर पंचायतचा स्वच्छता विभाग सांभाळणाऱ्या समन्वयकाला जबाबदार धरून या गंभीर प्रकरणाची आधी पोलिसांकडे तक्रार देणे अपेक्षित होते. मात्र त्याबाबत मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.
नगर परिषदेच्या आवारात असलेल्या भंगार कचरागाडीच्या टाकीत (कचराकुंडीत) आणि परिसरात अनेक तिरंगी ध्वज बऱ्याच दिवसांपासून विखुरलेले असताना स्वच्छता कर्मचारी किंवा संबंधित जबाबदार अधिकाऱ्याला ते लक्षात आले नाही, यावरून कार्यालयीन स्वच्छतेकडे त्यांचे किती लक्ष असते याचीही झलक दिसून येते. असे असताना प्रभारी मुख्याधिकारी बेजबाबदारपणे वागणाऱ्या स्वच्छता विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत असेल तर मुख्याधिकाऱ्यांवरही कर्तव्यात ढिसाळपणा केल्याप्रकरणी कारवाई का केली जात नाही? अशीही संतप्त प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात मुख्याधिकारी धनबाते यांना विचारले असता हे प्रकरण गंभीर आहेच, स्वच्छता विभागाची ती जबाबदारी आहे हे खरे आहे. मात्र नेमके कोण जबाबदार आहे हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले. वास्तविक कार्यालयीन परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणने मांडायला सांगितल्यानंतर कोणीही कर्मचारी तो गुन्हा स्वत:हून कबुल करणार नाही. केवळ टाईमपास म्हणून थातूरमातूर चौकशी करणे आणि नंतर तंबी देऊन प्रकरणावर पडदा टाकणे, असा प्रकार होण्याची शक्यता आहे.
अशा ढिसाळ कारभाराने कर्मचाऱ्यांना शिस्त लागेल की बेशिस्त कर्मचाऱ्यांची हिंमत वाढेल याचा विचार प्रशासनाने करून या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करावी, आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्याला शिक्षा द्यावी, अशी मागणी कुरखेडा येथील नागरिकांकडून केली जात आहे.































