

गडचिरोली : पोलीस दलाच्या वतीने आयोजित ‘गडचिरोली महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वात रविवारी (दि.28) मोठ्या संख्येने जिल्हाभरातील तरुणाईसह सर्व वयोगटातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी 14 हजार स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यांचा उत्साह पाहून स्पर्धेचे उद्घाटक असलेले सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल यांनाही स्पर्धेत सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही आणि त्यांनी 3 किलोमीटरचा राऊंड पूर्ण केला. एवढेच नाही तर लॅायड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांनी 21 किलोमीटर धावून राऊंड पूर्ण केला.
‘आज केवळ नागरिक धावत नाहीत, तर गडचिरोलीचा विकास धावत आहे. गडचिरोलीकरांची ही जिद्द आणि सकारात्मक ऊर्जा जिल्ह्याचा कायापालट घडविल्याशिवाय राहणार नाही,’ असे गौरवपूर्ण प्रतिपादन ॲड.आशिष जयस्वाल यांनी याप्रसंगी केले.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भल्या पहाटे दिसत उजाडण्याआधीच या स्पर्धेला सुरूवात झाली. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे, पोलीस उपमहानिरीक्षक अंकीत गोयल, पोलीस अधीक्षक निलोत्पल, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन, तसेच अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
ना.जयस्वाल यांनी मॅरेथॉनच्या सुंदर व यशस्वी आयोजनाची स्तुती केली. गडचिरोली जिल्हा आता इतर जिल्ह्यांना प्रेरणा देणारे काम करत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
लॅायड्स सोबत अनेकांचे सहकार्य
सदर महामॅरेथॅान स्पर्धेसाठी प्रायोजक म्हणून लॉयड्स मेटल्स सुरजागड, राणा शिपिंग कंपनी, मायाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज वडसा, सुरजागड ईस्पात एटापल्ली, एसबीआय बँक गडचिरोली, अजयदीप कंन्स्ट्रक्शन, द गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., आणि एल.आय.सी. गडचिरोली यांनी हातभार लावून मोलाचा वाटा उचलला. सदर स्पर्धा ही जिल्हा परिषद मैदानापासून सुरु होऊन चंद्रपूर रोडवरील आयटीआय चौक, रिलायंस पेट्रोलपंप, कारगिल चौक, इंदिरा गांधी चौक, ट्रेंड्स मॉल, बोधली चौकापासून परत जिल्हा परिषद मैदान या मार्गावर झाली.
विजेत्यांना बक्षीस वितरण
या महामॅरेथॉनमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांतून सुमारे 14 हजार नागरिकांनी सहभाग घेतला. 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर आणि 3 किलोमीटर अशा विविध अंतरांच्या शर्यतींचे यात आयोजन केले होते. नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला तसेच पोलीस व सुरक्षा दलातील जवानांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत हा कार्यक्रम यशस्वी केला. 21 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात साक्षी पोलादवार, तर पुरुषांच्या गटात रोशन बोदलवार याने प्रथम क्रमांक मिळविला. 10 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात मुन्नी मडावी आणि पुरुषांच्या गटात रोहन बुरसे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 5 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- प्रणय सोरते, द्वितीय- राकेश नरोटे व तृतीय- संस्कार निकोडे, तसेच महिला गटात प्रथम- संघवी कापकर, द्वितीय- क्रांती कोडापे व तृतीय क्रमांक स्मृती चाकटवार यांनी पटकावला. 3 किलोमीटर स्पर्धेत पुरुष गटात प्रथम- साहिल सोनुले, द्वितीय- आयुष गव्हारे व तृतीय- प्रणय साबळे, तसेच महिला गटात प्रथम- शिवानी चौधरी, द्वितीय- मोनिका मडावी आणि तृतीय- श्रावणी तुम्मा यांनी क्रमांक पटकावला. प्रत्येक गटनिहाय तीन लोकांना बक्षीस देण्यात आले. त्यात 50 हजारांपासून तर 5 हजारांपर्यंतची बक्षीसे होती.
































