गडचिरोली : चामोर्शी तालुक्यासह परिसरातील रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे शेतकऱ्यांना शेतमाल आणण्यासाठी कसरत करावी लागत आहे. रस्ते व पुलांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांनी केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील चामोर्शी ते भेंडाळा -हरणघाट, भेंडाळा ते गणपूर ते अनखोडा– आष्टी, येनापूर ते लक्ष्मणपूर मुधोली चक नं.2 ते जयरामपूर, चामोर्शी ते आमगाव ते भाडभिडी–हळदवाही ते रेगडी, चामोर्शी ते घोट ते रेगडी, कुनघाडा ते मुर्मुरी ते पावीमुरांडा, रेखेगाव ते अनंतपूर, चामोर्शी ते जामगिरी–रामकृष्णपूर ते कोनसरी, येनापूर ते सुभाषग्राम, आमगाव महाल ते विसापूर–तळोधी, सोनापूर ते मारोडा–जामागिरी ते करकापल्ली–विष्णुपूर, मार्कंडा ते फराडा ते मोहुर्ली–ते–घारगाव–हरणघाट, भेंडाळा ते फोकुर्डी ते चामोर्शी, चामोर्शी ते चाकलपेठ–मुरखळा माल–नवेगाव ते लखमापूर बोरी, चामोर्शी ते वागदरा ते रामसागर–लखमापूर बोरी, चामोर्शी ते मुरखळा चक–वाकडी, घोट ते सुभाषग्राम ते कंसोबा मार्कंडा ते आष्टी, तसेच वाघोली ते हरणघाट या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
या रस्त्यांची अनेक वर्षांपासून कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्ते पूर्णतः उखडले आहेत. यामुळे शेकडो अपघात घडले. काही निष्पाप नागरिकांचा मृत्यूही झाला आहे, तर अनेकजण गंभीर जखमी होऊन अपंग झाले आहेत.
काही रस्त्यांवरील पुलांची अवस्था अधिकच धोकादायक बनली असून पुलांवर मोठे खड्डे पडले आहेत. पुलामधील लोखंडी रॉड बाहेर आलेले आहेत. त्यामुळे वाहनांचे टायर पंक्चर होणे, वाहने घसरून अपघात होण्याचे प्रकार रोज घडत आहेत. सध्या शेतीची कामे सुरू असून शेतकऱ्यांना धान, कापूस व इतर शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्यांमुळे शेतमाल वाहतूक कठीण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
प्रशासनाने तात्काळ सर्व रस्ते व पुलांची पाहणी करून दुरुस्ती व डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल, असा इशाराही गण्यारपवार यांनी दिला.
































