गडचिरोलीत मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

114 महिला-पुरूषांनी घेतला लाभ

गडचिरोली : जिल्ह्यात वाढत असलेल्या डोळ्यांच्या विकारांच्या पार्श्वभूमीवर लॅायन्स आय सेंटर सेवाग्राम, लॅायन्स क्लब गडचिरोली आणि स्पंदन फाऊंडेशन गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 114 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 79 पुरुष आणि 35 महिला रुग्णांचा समावेश होता. त्यापैकी 19 पुरुष व 10 महिला रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथे पाठविण्यात आले.

हे शिबिर चंद्रपूर मार्गावरील विद्याभारती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात झाले. सेवाग्राम मेडिकल कॉलेजच्या नेत्ररोग विभागाच्या तज्ज्ञ पथकाने या शिबिरात रुग्णांची तपासणी केली. तपासणीदरम्यान ज्यांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले, अशा रुग्णांची शस्त्रक्रिया लॅायन्स आय हॉस्पिटल, सेवाग्राम येथे पूर्णपणे मोफत करण्यात आली. रुग्णांसाठी मोफत प्रवास, भोजन, औषधे देऊन कोणतेही वैद्यकीय किंवा शस्त्रक्रिया शुल्क आकारण्यात आले नाही.

50 वर्षांपेक्षा जास्त असलेल्या तसेच अस्पष्ट दिसणे, रात्री दिसण्यात अडचण, डोळे पाणावणे, जळजळ किंवा डोळ्यात पांढरा डाग दिसणे अशी लक्षणे असलेल्या नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.

शिबिरात डॉ.बोदेले यांनी स्पंदन फाउंडेशन संस्थेचे प्रतिनिधित्व केले. तसेच लॅायन्स क्लबचे सदस्य महेश बोरेवार, नितीन बट्टुवार, किशोर चिलमवार, नारायण पद्मावार, सुरेश लडके, शांतिलाल सेता, सतीश पवार, नितीन चंबुलवार, दीपक मोरे, शेषराव येलेकर, प्रभू सादमवार, गुलाब मडावी, देवानंद कामडी, रमेश काळबांडे, घनश्याम परशुरामकर, मंजुषा मोरे, संध्या येलेकर, सविता बट्टुवार आणि संध्या चिलमवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.