प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, मात्र देखावा अपघाताचा

प्रेमात विश्वासघात, अन् हत्येत शेवट

मृत पती आणि खुनात सहभागी पत्नी सोनी
घटनास्थळी अपघात झाल्याचा देखावा करण्यासाठी दुचाकी अशी पाडून ठेवली होती

कुरखेडा : सात वर्षांपूर्वी त्यांचे एकमेकांशी प्रेम जुळले, दोघेही वेगवेगळ्या जातीचे, पण प्रेमाखातर त्यांनी आंतरजातीय विवाहसुद्धा केला. मात्र काही वर्षातच तिचे त्याच्यावरचे प्रेम आटले आणि दुसऱ्याच एका युवकावर तिने जीव लावला. ती त्याच्या प्रेमात एवढी बुडाली की पतीला सोडून ती त्याच्यासोबत राहायलाही लागली. यातून पतीसोबत झालेल्या भांडणात प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या करण्यात आली. हे प्रकरण अंगावर शेकू नये म्हणून अपघाताचा देखावा करण्यात आला. एखाद्या चित्रपटातील कथेप्रमाणे वाटणारा हा घटनाक्रम कुरखेडा तालुक्यात प्रत्यक्षात घडला.

देवानंद सूर्यभान डोंगरवार (32 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पत्नी रेखा उर्फ सोनी डोंगरवार आणि तिचा प्रियकर विश्वजीत सांगोळे यांना अटक केली आहे.

अन् ती पतीला सोडून त्याच्याकडे गेली

प्राप्त माहितीनुसार, देवानंद डोंगरवार आणि आंधळी येथील युवती रेखा उर्फ सोनी यांचा 2018 मध्ये आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. शासनाच्या योजनेनुसार त्यांना 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदानही मिळाले होते. सुरुवातीला त्यांचा संसार आनंदाने सुरू होता, पण काही काळानंतर सोनी ही राजोली येथील विश्वजीत सांगोळे याच्या संपर्कात आली. तो गेवर्धा येथील महामार्ग बांधकाम कंपनीत वाहनचालक म्हणून काम करतो त्याच कंपनीच्या बेस कॅम्पमध्ये राहतो. सोनी ही त्याच्या संपर्कात आल्यानंतर तिला पतीपेक्षा विश्वजित अधिक प्रिय वाटू लागला. त्यातूनच रेखाने दोन महिन्यांपूर्वी आपले घर सोडले आणि ती विश्वजित सोबत कुरखेडा येथील राणाप्रताप वार्डात एकत्र राहायला लागले.

सोनीने केली 50 हजार रुपयांची मागणी

या प्रकारामुळे व्यथित झालेल्या देवानंदने पत्नी सोनी हिला परत येण्यासाठी अनेकदा समजावले. प्रकरण तंटामुक्त समितीपर्यंत पोहोचले, पण रेखाने भाव दिला नाही. मला देवानंदसोबत संसार करायचा नाही, अशी ठाम भूमिका तिने घेतली. तंटामुक्त समितीने विवाहबंधनातून मुक्त करण्याचा सल्ला दिला, मात्र रेखाने आंतरजातीय विवाहासाठी मिळालेले 50 हजार रुपये मला दिल्यानंतरच सोडचिठ्ठी देईन, अशी अट घातली.

हत्येनंतर अपघाताचा देखावा

देवानंद नेहमीच कुरखेड्यात पत्नीकडे जाणे-येणे करायचा. घटनेच्या दिवशी दुपारी तो पुन्हा तिच्या घरी आला. रात्री तिघांमध्ये जोरदार वाद झाला. भांडण इतके टोकाचे झाले की, देवानंदच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घाबरलेल्या रेखा उर्फ सोनी आणि विश्वजीत सांगोळे यांनी देवानंदचा मृतदेह त्याच्याच मोटारसायकलने सती नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाशेजारच्या रस्त्याच्या बाजूला नेला. तेथे मृतदेह फेकून मोटारसायकल तोडून अपघात झाल्याचा देखावा तयार केला.

अन् हत्येचा उलगडा झाला

अपघाताचा देखावा केल्यास आपल्यावर कोणाचा संशय येणार नाही, असे विश्वजित आणि सोनीला वाटत होते. पण रक्ताच्या ठशांनी हा खेळ उघडा पडला. त्यांच्या खोलीपासून पुलापर्यंत रस्त्यावर पडलेल्या रक्ताच्या डागांनी पोलिसांना घटनेचा छडा लावण्यास वेळ लागला नाही. कुरखेडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रेखा उर्फ सोनी देवानंद डोंगरवार आणि विश्वजीत सांगोळे यांना ताब्यात घेतले.

प्रेमातील त्रिकोणाने झाला घात

देवानंद हा कुटुंबातील एकटाच मुलगा होता. त्याच्या दोन बहिणींचा विवाह झाला आहे, आईचे निधन झाले असून तो वडील आणि आजीसोबत गेवर्ध्यात राहायचा. घटनेची माहिती मिळताच वडील रात्रीच ओळख पटवण्यासाठी आले. या हत्येने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रेम, विश्वासघात आणि हत्येच्या त्रिकोणातून घडलेल्या या घटनेबद्दल परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.