
सिरोंचा : राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हजरत वली हैदरशाह यांच्या ऊर्सला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली. पहिल्याच दिवशी ऊर्स व कव्वाली कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट देऊन चादर चढवत दर्शन घेतले.
सिरोंचा तालुक्यात दरवर्षी उर्स महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. येथे होणाऱ्या उर्स जत्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणूनही या उर्सकडे पाहिले जाते. या निमित्ताने होणारे उर्स संदल, कुराण पठण, ध्वज चढविणे आदी कार्यक्रम व कव्वाली पाहण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यासह लगतच्या तेलंगणा व छत्तीसगड राज्यातील सर्वधर्मीय भाविक मोठ्या संख्येने येतात.
आ.धर्मरावबाबा आत्राम यांनी भेट घेऊन चादर चढवत समस्त नागरिकांना सुख-शांती, समाधान व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना केली. यावेळी उर्फ कमिटी आणि एमआयडीके ट्रस्ट कमिटीतर्फे त्यांचा मोठा हार व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
उर्स कमिटी हॉलचे लोकार्पण
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या उर्स कमिटी हॉलचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आमदार आत्राम यांनी या कामासाठी 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या माध्यमातून उर्स कमिटी हॉलची उभारणी करण्यात आली. नव्याने उभारलेला हा हॉल धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी उपयोगी ठरणार आहे. लोकार्पणप्रसंगी उर्स कमिटीचे पदाधिकारी, स्थानिक जनप्रतिनिधी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
































