मुलामुलींसाठी ‘मेरा युवा भारत’ तर्फे क्रीडा स्पर्धेचे आयोजन

बोदीनच्या मैदानावर रंगले सामने

गडचिरोली : युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या अधिनस्थ असलेल्या ‘मेरा युवा भारत’ गडचिरोलीच्या वतीने स्वयंसेवकांसाठी दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन नवयुवक क्रीडा मंडळ, ग्रामसभा बोदीनच्या पटांगणावर केले होते. यामध्ये मुलांसाठी कबड्डी, 100 मीटर दौड, गोळा फेक, तर मुलींसाठी खो-खो, 100 मीटर दौड, गोळा फेक अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

युवकांचे आरोग्य चांगले राहावे आणि विविध खेळांमधून युवकांमध्ये सुदृढ भारताविषयी जाणिव-जागृती व्हावी यासाठी या क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्या संघाला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

मुलांच्या गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक विजय दानू हिचामी, द्वितीय हिमांशू गावतुरे, तृतीय क्रमांक रुपेश गावडे, शंभर मीटर दौडमधे प्रथम प्रकाश रामजी गावडे, द्वितीय श्रीराम बंडूजी वाढई, आणि तृतीय क्रमांक गनानन रुषी नरोटे, तसेच कबड्डीमधे नवयुवक संघाने प्रथम क्रमांक व जय कामतळा कबड्डी संघाने द्वितीय क्रमांक पटकविला.

मुलींमधून गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम सुष्मिता संपतराम उसेंडी, द्वितीय रिना राजेश जाळे व तृतीय क्रमांक वंदना रुषी जाळे, शंभर मीटर दौडमधे प्रथम क्रमांक सुष्मिता अंताराम उसेंडी, द्वितीय शांता महादेव जाळे, तृतीय क्रमांक जान्हवी रुषी जाळे हिने पटकविला. मुलींच्या खो- खो स्पर्धेमध्ये बोदीन संघाने प्रथम क्रमांक तर कामतळा संघाने द्वितीय क्रमांक पटकविला.

बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी बोदीनच्या सरपंच सुरजा उसेंडी यांनी मार्गदर्शन केले. खेळांमुळे युवकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहाते आणि त्यातून सुदृढ समाज तयार होण्यास मदत होते, मेरा युवा भारततर्फे राबविण्यात येत असलेला हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन केले.

मेरा युवा भारत जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम आणि एपीए मंगेश दुबे यांच्या मार्गदर्शनामधे नवयुवक क्रीडा मंडळ ग्रामसभा बोदीन यांच्या नेतृत्वात या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवराम गावडे, उमेश जाळे, शिवराम गावडे यांनी मेहनत घेतली.