एटापल्ली : शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या ग़ुरुपल्ली गावाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. रमेश धर्मा मडावी असे मृताचे नाव आहे. या अपघातात विलास भगवान टेकाम आणि सोमजी मडावी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. तिघांपैकी कोणीही हेल्मेट घालून नव्हते हे विशेष.

प्राप्त माहितीनुसार, एटापल्ली येथून मजुरीचे काम आटोपून रमेश धर्मा मडावी (रा.नलीकोन्डा, तेलंगणा) हे आपले सहकारी विलास भगवान टेकाम यांच्यासोबत दुचाकीवरून आलापल्लीकडे जात होते. त्याचवेळी करपनफुडी (ता.एटापल्ली) येथील सोमजी मडावी हे समोरून दुचाकीवरून येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक होऊन तिघेही गंभीर जखमी झाले. यात रमेश मडावी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एटापल्ली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली एटापल्ली पोलीस करीत आहेत. एटापल्ली- गुरुपल्ली मार्गावर वेगमर्यादेचे पालन केले जात नाही. मद्यप्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे या मार्गावर तातडीने वाहतूक नियंत्रक पोलिसाच्या नियुक्तीसह सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.
































