राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत ‘गोंडवाना’चा विद्यार्थी प्रथम

‘एआय’मुळे विचारक्षमता खुंटतेय

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचा विद्यार्थी प्रेम नामदेव जरपोतवार याने आपल्या राज्यस्तरावर विद्यापीठाचा डंका वाजवला आहे. मूल येथील कर्मवीर महाविद्यालयात आयोजित ‘राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेत’ प्रेम याने प्रथम क्रमांक पटकावून विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. (अधिक बातमी खाली वाचा)

या स्पर्धेसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) मानवी विचार करण्याची क्षमता खुंटत आहे’ हा अत्यंत आव्हानात्मक आणि समकालीन विषय देण्यात आला होता. प्रेमने या विषयाच्या बाजूने अत्यंत प्रभावी आणि तर्कशुद्ध मुद्दे मांडले. “आजचे युग हे तंत्रज्ञानाचे असले तरी, मानवी मेंदूची जागा मशीन घेऊ शकत नाही. एआयच्या अतिवापरामुळे माणसाची स्वतःची विचार करण्याची आणि कल्पनाशक्तीची क्षमता मंदावत चालली आहे,” असा इशारा त्याने दिला. त्याच्या या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थितांची मने जिंकली.

या यशासाठी जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख डॉ.सरफराज अन्सारी यांनी कुलगुरू डॉ.प्रशांत बोकरे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आभार मानले. विद्यापीठ प्रशासनाच्या सकारात्मक पाठबळामुळेच ग्रामीण भागातील विद्यार्थी अशा तांत्रिक आणि जागतिक विषयांवर राज्यस्तरावर नाव लौकिक करू शकत आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.