पंकज लाडे, जान्हवी पेद्दीवार ठरले युवा पुरस्काराचे मानकरी

राष्ट्रीय युवा दिनी कार्याचा गौरव

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवक-युवती तसेच सामाजिक संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी दरवर्षी जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन 2024-25 या वर्षासाठी जिल्हा युवा पुरस्कारांचे वितरण जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून करण्यात आले.

जिल्हा युवा पुरस्कार निवड समितीच्या माध्यमातून या वर्षासाठी निवड करण्यात आलेल्यांमध्ये युवकांमधून पंकज सुधाकर लाडे (रा.चोप, पो.कोरेगांव, ता.देसाईगंज) आणि युवतींमधून जान्हवी विजय पेद्दीवार (रा.चामोर्शी), तसेच संस्थात्मक पुरस्कारासाठी आधार विश्व फाउंडेशन, गडचिरोली (सुशील रामराव हिंगे, आशीर्वाद हिंगे, आशीर्वाद नगर, गडचिरोली) यांची निवड करण्यात आली.

या पुरस्कारांचे स्वरूप युवक व युवती यांना प्रत्येकी रोख 10 हजार रुपये, तर संस्थेला रोख 50 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारामुळे युवक-युवती व सामाजिक संस्थांना युवक विकासाच्या कार्यासाठी अधिक प्रेरणा मिळेल, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी जिल्हा युवा पुरस्कार समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे, सदस्य सचिव तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, पुरस्कारार्थी, संस्थेचे पदाधिकारी तसेच संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.