

गडचिरोली : जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे या मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या हस्ते पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व नगराध्यक्ष ॲड.प्रणोती निंबोरकर होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, तसेच नगरसेवक शेखर आखाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे उपस्थित होते.
या उद्घाटनप्रसंगी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनी सिकलसेल हा केवळ वैद्यकीय नव्हे तर सामाजिक प्रश्न असल्याचे नमूद केले. “लोकसहभागातून आणि व्यापक तपासणी व प्रबोधनातूनच सिकलसेलमुक्त गडचिरोलीचे स्वप्न साकार होईल,” असे सांगत त्यांनी नागरिकांना तपासणीस पुढे येण्याचे आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मोहिमेची व्याप्ती गावस्तरापर्यंत वाढवण्याचे निर्देश दिले. दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत स्क्रिनिंग पोहोचवून वेळीच निदान व उपचार करण्यावर त्यांनी भर दिला. नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी जनजागृतीची भूमिका अधोरेखित करत सामाजिक स्तरावर व्यापक प्रबोधनाची आवश्यकता व्यक्त केली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी पथनाट्यातून दिलेला संदेश समाजात पोहोचल्यास सिकलसेल निर्मूलन सहज शक्य असल्याचे सांगितले. आरोग्य यंत्रणा सर्व विभागांच्या सहकार्याने मोहीम यशस्वी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा लहाडे यांनी हायड्रॉक्सी युरिया उपचारांच्या प्रभावी वापरामुळे सिकलसेलमुळे होणाऱ्या गंभीर रुग्णसंख्येत घट झाल्याचे नमूद केले.
पथनाट्यातून प्रभावी जनजागृती
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेली दोन पथनाट्ये होती. सिकलसेल आजाराची लक्षणे, विवाहपूर्व तपासणीचे महत्त्व, ‘कुंडलीपेक्षा सिकलसेल रिपोर्ट पाहा’ हा समाजोपयोगी संदेश आणि आजारावर मात करण्यासाठी आवश्यक काळजी, यांचे प्रभावी सादरीकरण विद्यार्थिनींनी केले. या कलाविष्काराबद्दल मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक करून शाबासकी दिली.
या कार्यक्रमास जिल्हा महिला रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मनिष मेश्राम, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बागराज धुर्वे, फिजिशियन डॉ.इंद्रजित नागदेवते, डॉ.प्रशांत पेंदाम व डॉ.प्रफुल्ल गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिकलसेल नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमित साळवे यांनी केले. ‘अरुणोदय’ मोहिमेची व्याप्ती व उपलब्ध आरोग्य सुविधांची माहिती त्यांनी दिली. आभार प्रदर्शन जिल्हा सिकलसेल समन्वयक रचना फुलझेले यांनी केले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचारी, सूत्रसंचालन करणाऱ्या रुचिता सयाम व प्रिया चाचेरे, परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य मेघा कुळसंगे, नर्सिंग स्कूलची चमू, साई नर्सिंग स्कूलचे प्राचार्य, सिकलसेल समुपदेशक नीता बालपांडे, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
































