गडचिरोली : जिल्हा मुख्यालयालगत असलेल्या नवेगाव येथे सुरू अससेल्या एका नवीन ले-आऊटमधील कामासाठी मुरूम घेऊन जाणाऱ्या मालवाहू वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरत आहे. धूळ उडू नये म्हणून पाणी मारण्याची दक्षताही घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यातूनच त्रस्त महिलांनी पुढाकार घेत या कामावरील गाड्या अडविल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
डंपर-ट्रकसारख्या जड वाहनांनी मुरूमासह इतर साहित्यांची ने-आण केली जाते. आधीच कच्चा रस्ता, त्यात जड वाहनांची वर्दळ यामुळे उडणाऱ्या धुळीने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यांना घराबाहेर पडणेही कठीण जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन ले-आऊटमध्ये हे माती भरण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात कुठेही गतिरोधक नसल्याने वाहनांचा वेग अधिक असतो. त्यामुळे प्रचंड धूळ उडते. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध नागरिक व महिलांना बसत आहे. खोकला, दमा, श्वसनविकार, डोळ्यांची जळजळ यांसारख्या आजारांमध्ये वाढ झाल्याचे ग्रामस्थ सांगतात.
नवेगाव बस थांबा ते सेमाना रोड हा महत्त्वाचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून कच्चाच आहे. आजही रस्त्याचे डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर झालेले नाही. पावसाळ्यात चिखल तर उन्हाळ्यात धूळ, अशी स्थिती कायम आहे. या समस्येसंदर्भात नवेगाव (मुरखळा) येथील सरपंच चांदेकर व उपसरपंच राजू खंगार यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या. महिलांनी मोर्चे काढून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
तक्रार घेऊन गेलेल्या नागरिकांना “गाव आबादीत घरं कशाला बांधली?, एन.ए. प्लॉट का घेतले नाहीत?” अशी उत्तरे दिली जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. लोकप्रतिनिधींच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, गावातील स्वच्छतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक दिवसांपासून कचरा संकलन गाडी येत नसल्याने कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. या सर्व प्रश्नांकडे स्थानिक नागरिकांनी आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांचेही लक्ष वेधले आहे. “शहरांप्रमाणे खेड्यांमध्येही माणसेच राहतात. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होऊ नये,” अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
मुख्य रस्त्यांचे तातडीने सिमेंट काँक्रिट रस्त्यात रूपांतर करून, धूळ नियंत्रणासाठी नियमित पाण्याचा मारा करावा, अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक बसवावे, तसेच कचरा संकलन तात्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रशासनाने दखल न घेतल्यास नवेगावात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
































