गडचिरोली : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल हे दि.20 व 21 जानेवारी रोजी दोन दिवसांच्या गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते जिल्ह्यातील खनिज प्रकल्प, औद्योगिक विकास तसेच ग्रामीण विकासाशी संबंधित विविध कामांचा सविस्तर आढावा घेणार आहेत. त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार, दि.20 रोजी सकाळी 11 वाजता मुख्य सचिव अग्रवाल यांचे सुरजागड येथे जातील. तेथे खनिज परिसर, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व (CSR) उपक्रम, तसेच जिल्हा खनिज प्रतिष्ठानअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता कोनसरीकडे प्रयाण करून 12.45 वाजता कोनसरी स्टील प्रकल्पाची पाहणी करतील.
दुपारी 2.40 वाजता ते मार्कंडा देवस्थान येथे भेट देणार असून, तेथे भारतीय पुरातत्व विभाग तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) यांच्या अधिकाऱ्यांसोबत मंदिर जीर्णोद्धार व घाट विकासाबाबत चर्चा करतील.
सायंकाळी 5 वाजता गडचिरोली येथील सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग (CIIIT) येथे पाहणी करतील. त्यानंतर सायंकाळी 5.40 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासोबत ग्रामीण विकासाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करतील.
बुधवार, दिनांक 21 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा प्रशासन व खनिकर्म विभागाच्या कामांचा मुख्य सचिव आढावा घेतील. त्यानंतर दुपारी 12 वाजता चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
































