भरधाव ट्रॅव्हल्स बसने दिली एसटी बसला मागून धडक

ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी जखमी

आरमोरी : गडचिरोलीकडून आरमोरीच्या दिशेने जात असलेल्या एसटी बसला गडचिरोलीकडून नागपूरकडे जात असलेल्या साई ट्रॅव्हल्सच्या बसने मागून जोरदार धडक दिली. यामुळे ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी चांगलेच जखमी झाले. या धडकेमुळे जोरदार झटका बसल्याने बहुतांश प्रवाशांच्या चेहऱ्याला मार लागला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाचे चालक शत्रुघन लहानुजी मगरे (50 वर्ष) हे बस क्रमांक एमएच 14, एलएक्स 5926 घेऊन गडचिरोलीवरून आरमोरी, कासवी, फरी, वडसा येथे जाण्यासाठी निघाले होते. सकाळी 9 वाजताच्या सुमारास चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर आरमोरीच्या दिशेने पहिल्या वळणाजवळ पोहोचले असताना साई ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक एमएच 34, एबी 8320) मागून आली आणि एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. चालकाच्या या निष्काळजीपणामुळे ट्रॅव्हल्स बसमधील 20 प्रवासी जखमी झाले. याशिवाय एसटी बसचे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.

याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी कलम 281, 125(A), 125 (B), 324 (4) भा.न्या.स.2023 सहकलम 184 सायंकाळी मो.वा.का. अन्वये ट्रॅव्हल्स बसच्या चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोउपनि विजय चलाख करीत आहेत.