गडचिरोली : चंदीगड विद्यापीठ येथे पार पडलेल्या ऑल इंडिया रेसलिंग गेम्स 2025-26 या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाचे नाव देशात उंचावले. देशभरातील विविध विद्यापीठांतील कुस्तीपटूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत गोंडवानाच्या खेळाडूंनी आपल्या ताकद, तंत्र आणि चिकाटीच्या जोरावर ही पदकांची कमाई केली.
गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित भगवान श्री चक्रधर स्वामी शारीरिक शिक्षण महाविद्यालय तळोधी (बाळापूर), जिल्हा चंद्रपूर येथील हे दोन्ही विद्यार्थी आहेत. फ्री स्टाईल 74 किलो वजनगटात निशांत रुहिल याने सुवर्णपदक, तर ग्रीको-रोमन 82 किलो वजनगटात विजय करमबीर याने रौप्यपदक पटकावले. निशांतला प्रशिक्षक समुंदर दलाल यांचे, तर विजयला प्रशिक्षक आशिष देवतळे यांचे मार्गदर्शन मिळाले.
संघाच्या या यशामागे संघ व्यवस्थापक डॉ.जंगबहादूरसिंग राठी यांचे प्रभावी नियोजन, शिस्तबद्ध नेतृत्व आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तसेच खेळाडूंना गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा संचालक डॉ.अनिता लोखंडे यांचेही मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापकांचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण यांनी अभिनंदन केले. या यशामुळे गोंडवाना विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रातील गुणवत्ता आणि क्षमता पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाली आहे.
































