लॉयड्स मेटल्सच्या व्हॉलीबॉल व ग्रामीण कबड्डी संघांना विजेतेपद

जिल्हास्तरीय सामन्यांमध्ये चमकले

विजेतेपद पटकावणारा लॅायड्सचा कबड्डी संघ
लॅायड्स व्हॅालिबॅाल संघातील खेळाडू

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील गोवारी येथे आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत लॉयड्स व्हॉलीबॉल संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तसेच परसलगोंदी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आलेंगा येथे आयोजित जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावले.

व्हॅालिबॅाल स्पर्धेत एकूण 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात लॉयड्स संघाने 15–10 असा मोठा विजय नोंदवत स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. याचबरोबर, परसलगोंदी येथील लॉयड्स ग्रामीण कबड्डी संघाने आलेंगा येथे आयोजित जिल्हास्तरीय ग्रामीण कबड्डी स्पर्धेत अपराजित राहून ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत 45 संघांनी सहभाग घेतला होता.

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे सकारात्मक परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. ग्रामीण व तळागाळातील गुणवान युवक खेळाडूंना ओळखून त्यांना संधी देण्याचे त्यांचे स्वप्न लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरले आहे. अकादमीअंतर्गत प्रशिक्षण घेतलेल्या खेळाडूंनी व्हॉलीबॉल व ग्रामीण कबड्डी या दोन जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवून क्रीडा विकास उपक्रमांचे यश अधोरेखित केले आहे.

लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण व तळागाळातील खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, क्रीडा सुविधा आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न नेहमी केले जातात. दुर्गम भागांतील क्रीडा प्रतिभा विकसित करण्यावर अकादमीचा भर असतो. युवकांना शिक्षणासोबत खेळातही करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या अलीकडील यशामुळे खेळाडू, तसेच स्थानिक समुदायांचा आत्मविश्वास वाढला आहे. भविष्यातील उत्कृष्ट खेळाडू घडवण्यासाठी नियोजनबद्ध व दीर्घकालीन क्रीडा उपक्रम राबवण्याच्या अकादमीच्या बांधिलकीला यातून बळ मिळाले आहे.