आरमोरी : वडधा येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय बाबुराव पाटील भोयर कला महाविद्यालयाच्या नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाला गती देण्याच्या उद्देशाने बाबुराव पाटील भोयर कला महाविद्यालय नुतन इमारतीत स्थानांतरित करण्यात आले. अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला सहउद्घाटक म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे, तर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा.धर्मेंद्र मुनघाटे आणि अतिथी म्हणून मदन मेश्राम उपस्थित होते.
ग्रामीण विकासात महाविद्यालयाच्या योगदानावर बोलताना आ.गजबे म्हणाले, महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि एनएसएस शिबिराच्या माध्यमातून युवकांमध्ये समाजसेवेची आवड निर्माण होईल. प्रा.मुनघाटे यांनी गोंडवाना विद्यापीठ क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्रगतीवर समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संजय बर्वे, वनिता सहकाटे, विवेक पाटील खेवले, डॉ.बळवंत लाकडे, अनिल सावळे, डॉ.बर्वे, रमेश कोलते, डॉ.दुर्वेश भोयर, प्रिया गेडाम यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय सेवा योजना विभाग, ग्रामपंचायत व ग्रामवासी वडधा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरामुळे संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
































