खनिज क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी पोषण आहाराची ‘फुड बास्केट’

जिल्हा खनिज प्रतिष्ठानमार्फत खर्च

सामंजस्य करारप्रसंगी उपस्थित जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, सीईओ गाडे व संबंधित संस्थांचे प्रतिनिधी

गडचिरोली : खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोगाच्या (टीबी) रुग्णांचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना नि:शुल्क पोषण आहार पुरविला जाणार आहे. जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प) यांच्यात यासंदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार संबंधित क्षयरोग रुग्णांना दररोज फूड ‘फुड बास्केट’ पुरविण्यात येणार आहे. याचा सर्व खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडून केला जाणार आहे. पुढील तीन वर्षांसाठी हा करार करण्यात आला आहे.

हा फूड बास्केट पुरवठा ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, ‘उमेद’कडून एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर, ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीच्या संचालिका संध्या गेडाम व सुनीता शेंडे, तसेच खनिज प्रतिष्ठानचे डॉ.तारीक उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या फूड बास्केटमध्ये धान्ये, ज्वारी-भाजरीसारखी भरड धान्ये, विविध डाळी, वनस्पतीजन्य खाद्यतेल, दुधाची भुकटी, दूध, भुईमूग, अंडी आदी पोषणमूल्यांनी परिपूर्ण साहित्याचा समावेश राहणार आहे. क्षयरोग रुग्णांच्या उपचारांसोबतच त्यांचे पोषण सुधारावे, आजारावर मात करण्याची क्षमता वाढावी आणि उपचारांचा अपेक्षित परिणाम साधता यावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

महिलांच्या शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत फूड बास्केट पुरवठा केल्याने महिला सक्षमीकरणालाही यातून चालना मिळणार आहे. तसेच स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती आणि आर्थिक स्थैर्य वाढीस मदत होणार आहे.