गडचिरोली : शेतात जाणारा रस्ता मोकळा करण्याच्या शासकीय प्रक्रियेत अडथळा निर्माण करून अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी, गडचिरोलीच्या तहसीलदारांनी एका महिलेसह तिच्या मुलावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेमुळे मौजा पारडी कुपी परिसरात खळबळ माजली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मौजा पारडी कुपी येथील शेत जमीन गट क्र.746/1 चे मालक शरद तुकाराम लोंढे यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मंजूर करण्यात आला होता. या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी नायब तहसीलदार चंदू प्रधान यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी आर.पी. सिडाम, ग्राम महसूल अधिकारी एम.के. इचकापे आणि पोलिसांचे पथक दि.23 जानेवारी रोजी घटनास्थळी पोहोचले होते.
जेसीबी समोर झोपून जाळण्याची धमकी
प्रशासकीय पथक रस्ता मोकळा करण्याचे काम करत असताना, शेजारील शेत जमीन (गट क्र.589) मालक उमाबाई मोतीराम नागापुरे यांनी रस्ता देण्यास तीव्र विरोध केला. त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर त्यांनी सुरू असलेल्या जेसीबी मशीनसमोर थेट आडवे होऊन काम रोखले. “रस्ता तयार केल्यास जेसीबी जाळून टाकीन,” अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली.
मुलाने कुऱ्हाड घेऊन केला हल्ल्याचा प्रयत्न
या वादात उमाबाई यांचा मुलगा विलास मोतीराम नागापुरे हा देखील सहभागी झाला. त्याने हातात कुऱ्हाड घेऊन शासकीय पथकाला अडविले आणि कामात अडथळा निर्माण केला. या माय-लेकांच्या हिंसक पवित्र्यामुळे प्रशासनाला मंजूर रस्त्याचे काम पूर्ण करता आले नाही.
भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई
शासकीय आदेशाचे उल्लंघन आणि कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी गडचिरोलीचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी सागर कांबळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 223 नुसार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
































