बिनागुंडामार्गे जिल्ह्यात येण्याचा माओवाद्यांचा मार्ग झाला बंद

नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक दुर्गम, अविकसित परिसर आणि माओवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्तीसगड सीमेकडील बिनागुंडा येथे शनिवारी (दि.24) नवीन पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. यामुळे छत्तीसगडकडून अबुझमाडच्या जंगलातून बिनागुंडामार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करण्याचा माओवाद्यांचा मार्ग बंद झाला आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि खासगी कंत्राटदाराच्या मदतीने अवघ्या 24 तासात हे पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या 2 वर्षात छत्तीसगड सीमेकडील भागात उभारलेले हे आठवे पोलीस मदत केंद्र आहे.

1000 सी–60 कमांडो, 18 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकाऱ्यांनी या पोलीस मदत केंद्राच्या उभारणीसाठी परिश्र घेतले. विशेष म्हणजे त्या भागात जाण्यासाठी साधा रस्ताही नसताना पोलिसांच्या जवानांनी मोठी वाहने जातील असा रस्ता तयार केला. त्यानंतर या केंद्राच्या उभारणीचे काम सुरू झाले.

विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सिआरपीएफ 9 बटालियनचे कमांडंट शंभु कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी व ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

विकासाला मिळणार गती

नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत प्रशासनाला पोहोचणे शक्य होणार आहे. या भागातील नागरिकांनी त्यांच्या कोणत्याही समस्येसाठी पोलिसांची मदत घ्यावी, असे अवाहन पो.महानिरीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी नागरिकांना उद्देशून केले. तर या मदत केंद्रामुळे या भागातील विकासाला गती मिळेल असा विश्वास पो.अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केला. हे पोलीस स्टेशन लाहेरीपासून 17 किमी आणि छत्तीसगड सिमेपासून फक्त 8 किमी अंतरावर आहे. अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता बिनागुंडा पोलीस मदत केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे.

केंद्रात अशा राहणार सोयी-सुविधा

सदर पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 8 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, या केंद्राच्या सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, सँन्ड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येणार आहे. यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 4 अधिकारी व 56 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 19, कुसळगाव बी कंपनीचे 2 प्लाटुन, तसेच सिआरपीएफ 9 बटालियन डी कंपनीचा 1 असिस्टंट कमांडंट व 79 अधिकारी/अंमलदार, 8 विशेष अभियान पथकाचे जवान (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत.

जनजागरण मेळाव्यातून साहित्यांचे वाटप

पोलीस मदत केंद्राच्या उभारणीदरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करून परिसरातील काही महिलांना साड्या, पुरुषांना धोतर, ब्लॅकेट, स्वयंपाकाची भांडी, बकेट, मच्छरदानी, युवकांना टि-शर्ट, नोटबुक, पेन, स्कुल बॅग, बिस्कीट, मुलांना क्रिकेट बॅट, बॉल, क्रिकेट स्टंप संच, व्हॉलीबॉल नेट, व्हॉलीबॉल इत्यादी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यासोबतच वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्य काळात या अतिदुर्गम भागात राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्णत्वास येण्यास मदत होणार आहे. या भागातील 7 मोबाईल टॉवरच्या रखडलेल्या कामालाही गती मिळणार आहे. पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे गुंडेनूर नाल्याच्या बांधकामास सुरक्षा मिळणार आहे. तसेच बिनागुंडाच्या दुर्गम भागात भविष्यात एस.टी. बस सेवा सुरु करणे शक्य होणार आहे.

या कार्यक्रमाप्रसंगी सीआरपीएफ 9 बटालियनचे कमांडंट शंभु कुमार, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम.रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी (भामरागड) अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र बिनागुंडाचे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि.रोहन पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.