स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 22 ला नागपुरात लाँगमार्च व मेळावा

वि.रा.आंदोलन समितीची माहिती

गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविण्याकरिता 2027 ची डेडलाईन घेऊन विदर्भ राज्य समिती सातत्याने प्रयत्न करीत आहे. विदर्भाची मागणी विदर्भाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचविण्याकरिता व जनसामान्याच्या मनात विदर्भाची चळवळ रुजविण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्यात येत्या 22 फेब्रुवारीला “विदर्भ निर्माण जनसंकल्प लाँगमार्च”चे आयोजन केले आहे.

वि.रा.आंदोलन समितीने 2025 मध्ये सहा जनसंकल्प मेळावे घेतले. त्यात मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागाचाही समावेश होता. याशिवाय कांरजा लाड. गडचिरोली, गोदिया, अमरावती (बडनेरा) तथा भंडाऱ्यातील जनतेचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

मिशन 2027 अंतर्गत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने “विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉगमार्च”ची सुरुवात नागपुरातील विदर्भ चंडिका मंदिर. शहीद चौक इतवारी येथून होणार आहे. हा मार्च टांगा स्टॅन्ड चौक, नंगा पुतळा चौक, डागा चौक, अग्रसेन चौक ते रुईकर चौकापर्यंत जाणार आहे. दुपारी 2 वाजता चिटणीस पार्क येथे जाहीर मेळावा होणार आहे.

या “विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉगमार्च व मेळाव्या”मध्ये 11 जिल्ह्यातील 120 तालुक्यांचे प्रतिनीधी, पदाधिकारी व विदर्भवादी मोठ्या संख्येने राहणार आहेत. या आंदोलनात सर्वासामान्य जनतेने आपल्या हक्काकरिता सहभागी होवून कार्यकम यशस्वी करावा, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.